नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – जेष्ठ नागरिकाला संपर्क करून पोलीस बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने मनीलॉड्रिंगची झाल्याचे सांगत तब्बल ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २६ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२६ कालावधीत धायरीत घडली आहे. याप्रकरणी ७४ वर्षीय जेष्ठाने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात गोळीबाराची दुसरी घटना; काेंढव्यात तरुणावर गोळीबार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, धायरी परिसरात राहयला आहेत. २६ ऑगस्टला सायबर चोरट्याने त्यांना मोबाइलवर संपर्क साधला. पोलीस असल्याची बतावणी करीत तक्रारदाराकडून मनीलॉड्रिंगसह अमली पदार्थांचे व्यवहार होत असल्याचे खोटे सांगितले. संबंधित प्रकरणात अटक करण्याची धमकी देउन सायबर चोरट्यांनी तक्रारदाराची विविध बँकखाते पडताळणीसाठी पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. तब्बल ४८ लाख रुपये वर्ग केल्यानंतरही सायबर चोरट्यांनी त्यांना धमकावले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित जेष्ठाने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रसाद राउत तपास करीत आहेत.
दिल्लीतील क्राईम ब्रँचच्या नावाखाली जेष्ठाला गंडा
जेष्ठ नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल असून, तो बंद करण्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने ६७ वर्षीय नागरिकाला पावणेसहा लाखांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ कालावधीत पाषाणमध्ये घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारक, वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक विश्लेषण द्वारे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.






















