चार प्लाझ्मा, चार प्रेशरमीडसह ६ ध्वनियंत्रणा जप्त
marathinews24.com
पुणे – डीजेच्या आवाजाला पुणेकरांचा विरोध असतानाही दहीहंडीत उपनगरांसह शहरात अनेक मंडळांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ध्वनि प्रदूषणाच्या नियमांना केराची टोपली दाखविणाऱ्या मंडळांवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पातळी ओलांडणाऱ्या ११६ मंडळांवर खटला भरला असून, बेशिस्त डीजेचा चार प्लाझ्मा, चार प्रेशरमीडसह सहा ध्वनियंत्रणा जप्त केल्या आहेत. एकीकडे काही मंडळांनी डीजे नको अशी भूमिका घेतली असली तरी शहराचा मध्यवर्ती भाग समजल्या जाणाऱ्या परिमंडळ एकच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे ५५ मंडळावर गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे मध्य भागात आवाजाची पातळी डावल्या गेल्याचे अधोरेखीत झाले आहे.
केतनच्या खूनात रियल इस्टेट एजंटचा सहभाग उघड – सविस्तर बातमी
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील तब्बल १ हजार १०० मंडळांच्या ध्वनीचे ‘रीडिंग’ घेतले होते. डीजे वादन सुरु असताना ध्वनीची तीव्रता किती होती, याची नोंद करण्यात आली. या नोंदीचे परीक्षण करून निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केलेल्या संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यासह कायदेशीर कारवाई केली आहे. ध्वनीच्या ‘रीडिंगचे परीक्षण करून नियमभंग करणाऱ्या मंडळांची छाननी करण्यात आली. त्यानंतर हा कारवाईचा बडगा उचलण्यात आला.
दहीहंडी उत्सव हा गणेशोत्सवापूर्वीची ‘रंगीत तालीम’ मानली जात होती. पोलिसांनी दहीहंडीपूर्वीच डीजे आणि ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार चार बेस आणि चार टॉपची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र, काही भागांत चार बेस, चार टॉपची संख्या मर्यादित असली, तरी आवाज कर्णकर्कश पातळीवर पोहोचल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. केवळ ध्वनियंत्रणांची संख्या मर्यादित ठेवणे पुरेसे नसून, निर्धारित डेसिबल पातळीचेही पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे चार बेस आणि चार टॉपची मर्यादा पाळूनही ध्वनीची निर्धारित पातळी ओलांडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अधिक क्षमतेची ध्वनिव्यवस्था वापरणाऱ्या मंडळांवरही पोलिसांनी तत्काळ कारवाई करून ध्वनियंत्रणा जप्त केल्या.
पुण्यात परिमंडळनिहाय दाखल झालेले खटले
परिमंडळ एकमध्ये सर्वाधिक ५५ गुन्हे, परिमंडळ दोनमध्ये २३, परिमंडळ तीनमध्ये १०, परिमंडळ सहामध्ये २७ गुन्हे, तर परिमंडळ सातमध्ये एक खटला दाखल केला.परिमंडळ चार आणि पाचमध्ये एकही गुन्हा दाखल झाला नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीतील कारवाईतून पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवातही ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.






















