मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक
marathinews24.com
पुणे – पुणे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध मतदारसंघांतील आमदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक कोंडी, मेट्रोची प्रलंबित कामे आणि जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती आदी विषय मांडले. प्रत्येक विकासकामासाठी जबाबदार अधिकारी, निधीचा स्रोत आणि काम पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादा ठरवावी, अशी मागणी त्यांनी केली.
मेट्रोच्या प्रत्येक टप्प्याचे काम वेळेत पूर्ण करावे. काम सुरू असलेल्या मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मेट्रो प्रशासन, वाहतूक पोलीस, महानगरपालिका आणि कंत्राटदारांनी संयुक्त वाहतूक व्यवस्थापन आराखडा राबवावा. पर्यायी मार्ग, दिशादर्शक फलक, सुरक्षित बॅरिकेडिंग आणि खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी सूचना त्यांनी केली.
पीएमआरडीए, दोन्ही महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय असावा. महत्त्वाच्या बैठकीला निर्णयक्षम अधिकारी उपस्थित असणे आवश्यक असून अधिकार कोणाकडे आहेत, पुढाकार कोण घेणार आणि काम कधी पूर्ण होणार, याची स्पष्ट माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
अभिजित दिपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची वस्तुस्थिती अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन तपासावी. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ किंवा लोकप्रतिनिधींकडून एखाद्या शाळेबाबत तक्रार प्राप्त झाल्यास वरिष्ठ आदेशाची वाट न पाहता शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतःहून शाळेला भेट द्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
शाळांमधील सुरक्षित वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, वीजपुरवठा, संरक्षक भिंत, शिक्षकांची रिक्त पदे, सुरक्षित वाहतूक आणि शालेय पोषण आहाराचा दर्जा तपासावा. गंभीर त्रुटी आढळलेल्या शाळांसाठी तातडीने सुधारणा आराखडा तयार करावा, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.
मागील बैठकीतील निर्देशांवर झालेल्या कार्यवाहीचा विभागनिहाय अहवाल पुढील बैठकीपूर्वी सादर करावा. “बैठकीत केवळ समस्या मांडून न थांबता प्रत्येक विषयावर कालमर्यादेत प्रत्यक्ष कार्यवाही झाली पाहिजे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
























