धनकवडी, वडगाव शेरीतील घरफोडीत साडे आठ लाखांचा ऐवज लांबविला
marathinews24.com
पुणे – सणासुदीच्या काळात शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. धनकवडी, वडगाव शेरी भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेआठ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. पुणे-सातारा रस्त्यावरील के. के. मार्केट समोरील पुण्याईनगर भागात सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दाागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिवाळीत चोरट्यांचा धडाका, रात्रीत १२ विद्युत पंप चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला के. के. मार्केट समोरील धनेश्वर मंदिर परिसरात कावेरी सोसायटीत राहायला आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या सदनिका बंद करुन बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी तीन लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. सायंकाळी पाचच्या सुमारास त्या घरी परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करत आहेत.
वडगाव शेरीतील गणेशनगर भागात असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४ लाख ८९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गणेशनगरमधील श्री ओम सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी ३० ऑक्टोबर रोजी सदनिकेचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने लांबविले. सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.
मार्केटयार्ड भागातील सोसायटीत चोरटे शिरले
मार्केटयार्ड भागातील एका सोसायटीत शिरुन चोरटे शिरल्याचा प्रकार उघडकीस आला. रहिवाशांनी आरडा ओरडा केल्यानंतर चोरटे पसार झाले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने फिर्याद दिली आहे.
बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर आरती अपार्टमेंट आहे. रविवारी (१ नाेव्हेंबर) पहाटे तीन चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. या घटनेची माहिती महिलेने वडिलांना दिली. त्यानंतर महिलेच्या वडिलांनी सदनिकेचा दरवाजा उघडला. तेव्हा तीन चोरटे आढळून आले. आरडाओरडा केल्यानंतर चोरटे सोसायटीच्या आवारातून पसार झाले. पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.























