आगाऊ रकमेच्या बहाण्याने फसवणूक
marathinews24.com
पुणे – ट्रस्टला मोठी देणगी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील डॉक्टरची १ कोटी ९७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. देणगी मिळविण्यासाठी आधी पैसे द्यावे लागतील, असे सांगून आरोपींनी वेळोवेळी रोकड स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी ऋषिकेश गोसावी (रा. पुणे, पूर्ण नाव उपलब्ध नाही), गणेश अरुण ठाणगे (रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), अभिषेक सूर्यवंशी (रा. पुणे), मोहम्मद (रा. मुंबई), नितू सिंग (रा. मुंबई), टेरेन्स विज (रा. बंगळूर), शेख (रा. दिल्ली) आणि एका अज्ञात व्यक्तीवर मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नरेश दिलीप मुनोत (वय ३८, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला.
जमीन व्यवहारात बनावट कागदपत्रे; दोघांवर गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून मुनोत यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या ट्रस्टला मोठ्या रकमेची देणगी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. देणगीचा निधी मिळविण्यापूर्वी विविध कारणांसाठी आगाऊ रक्कम भरावी लागेल, असे आरोपींनी सांगितले. त्यानुसार ईस्ट स्ट्रीटवरील मुनोत यांच्या दवाखान्यात आणि मार्केट यार्डमधील श्रीकृष्ण एंटरप्रायजेसच्या कार्यालयात व्यवहार करण्यात आले. आरोपींनी मुनोत यांच्याकडून १ कोटी ९७ लाख ६० हजार रुपये घेतले. मात्र, ट्रस्टला देणगी मिळवून दिली नाही. स्वीकारलेली रक्कमही परत केली नाही. मार्केटयार्ड पोलीस आर्थिक व्यवहारांची चौकशी करीत आहेत.






















