पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – हुंड्यासाठी महिलेचा छळ करुन एका भोंदूकडे नेऊन अघोरी कृत्य करण्यास भाग पाडल्या प्रकरणी पतीसह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी प्रदीप मनोहर पाटील (वय ३२), मालन मनोहर पाटील (वय ५२), प्रतिक्षा मनोहर पाटील (वय २७, तिघे रा. सराेळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), प्रीतम मनीष पाटील (वय ३०), मनीष पाटील (दोघे रा. नांदेड सिटी, सिंहगड रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंत्याचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा विवाह ठरल्यानंतर आरोपींनी १५ लाख रुपये हुंडा मागितला होता. फिर्यादी महिलेच्या वडिलांनी विवाह ठरल्यानंतर आरोपींना दोन लाख २० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने दिले होते. विवाह झाल्यानंतर हुंड्यातील रक्कम न दिल्याने महिलेचा छळ सुरू केला.“पतीला मंगळ ग्रहाची बाधा असून, बाधा दूर करण्यासाठी एका भोंदूकडे जावे लागेल’, असे आरोपींनी सांगितले. महिलेला एका भोंदूकडे नेल्यानंतर तिला अघोरी कृत्य करण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करुन मारहाण केली.
महिलेच्या पतीचा मंगळ दोष दूर झाल्याचे सांगून आरोपींनी फिर्यादी महिलेला नांदविण्यास नकार दिला. शारिरिक आणि मानसिक छळ, तसेच अघोरी कृत्य केल्या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी, जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल जगताप तपास करत आहेत.





















