रश्मी एज्युकेशन सोसायटीची फसवणूक केल्याचा आरोप
marathinews24.com
पुणे – धर्मादाय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची आवश्यक परवानगी न घेता रश्मी एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यातील दोन एकर ३४ आर जमीन तारण ठेवून त्यावर तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. तारण ठेवण्यात आलेल्या या जमिनीची अंदाजे किंमत ५० कोटी रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. संस्थेच्या मालमत्तेवर कोणताही अधिकृत अधिकार नसताना परवानगीशिवाय जमीन तारण ठेवून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नीला मनोहरलाल गुप्ता, रश्मी मनोहरलाल गुप्ता, सुलभा मोडक आणि अन्य संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परमेश्वर व्यंकटराव सोळुंके (वय ५९, रा. प्लॉट क्रमांक ९४, नाथपुरम हाउसिंग सोसायटी, इटखेडा, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रश्मी एज्युकेशन सोसायटी येरवडा येथे कार्यरत असून, संस्थेच्या नावावर आणि ताब्यात असलेली जमीन या व्यवहारासाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी २०२६ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संस्थेच्या मालकीची तसेच ताब्यातील दोन एकर ३४ आर जमीन संबंधितांनी तारण ठेवली. ही जमीन तारण ठेवताना धर्मादाय आयुक्त, पुणे कार्यालयाची तसेच जिल्हाधिकारी, पुणे कार्यालयाची आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
संस्थेच्या मालमत्तेच्या व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या अधिकृत प्रक्रियेचे पालन न करता संबंधितांनी ही जमीन अवान्स फायनान्स सर्व्हिसेस यांच्याकडे तारण ठेवली. त्यानंतर या जमिनीच्या आधारे १ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संस्थेच्या मालमत्तेवर अधिकार नसताना अथवा आवश्यक प्रशासकीय परवानग्या न घेता जमीन तारण ठेवून कर्ज उभारल्याने संस्थेची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्यवहारामुळे ५० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या संस्थेच्या जमिनीवर आर्थिक बोजा निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे संस्थेच्या मालमत्तेचा परस्पर वापर करून कर्ज उभारण्यामागे नेमकी कोणाची भूमिका होती, कर्जाची रक्कम कोणत्या कारणासाठी घेण्यात आली आणि या व्यवहारातून संस्थेला आर्थिक नुकसान झाले आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३६(२), ३३६(३), ३१८(४), ३४०(२) आणि ३(५) अन्वये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. जमीन तारण ठेवताना सादर करण्यात आलेली कागदपत्रे, कर्ज व्यवहार आणि संबंधित परवानग्यांची प्रक्रिया याचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.






















