ढोल-ताशांच्या गजरात रंगला ‘मंगलाचरण सोहळा
marathinews24.com
पुणे – पारंपरिक वेशभूषेतील मान्यवरांसह गणेशभक्तांची मांदियांळी, ढोल-ताशांचा गजर, खासदार मेधा कुलकर्णी आणि महापौर मंजुषा नागपुरे, तसेच पुणे फेस्टिवल २०२६ चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि जनरल सेक्रेटरी डॉ. सतीश देसाई यांनी धरलेला फुगडीचा फेर अशा अत्यंत चैतन्यदायी वातावरणात “पुणे फेस्टिव्हल”च्या बोधचिन्हाच्या भव्य रांगोळीचे अनावरण करीत पुणे फेस्टिव्हलतर्फे आगळा वेगळा असा ‘मंगलाचरण सोहळा’ पार पडला.
श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा १३४वा गणेशोत्सव उत्साहात – सविस्तर बातमी
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असलेल्या यंदाच्या पुणे फेस्टिव्हलतर्फे आज अलका चौकातील सेनापती बापट यांच्या पुतळ्याजवळ हा ‘मंगलाचरण सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवमुद्रा ढोल पथकाच्या स्थिर वादनाने श्री गणरायाच्या आगमनाची नांदी दिली. तर राष्ट्रीय कला अकादमी न्यासचे अमर लांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे फेस्टिव्हलचे बोधचिन्ह असलेली भव्य रांगोळी रेखाटून या सोहळ्याला रंगबिरंगी साज चढवला. उपस्थित मान्यवरांनी ढोल आणि झांजा वादनाचा आनंद घेतला.
या वेळी खासदार मेधा कुलकर्णी, महापौर मंजुषा नागपुरे, पुणे फेस्टिवल २०२६ चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुणे फेस्टिव्हलचे जनरल सेक्रेटरी डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू, या वेळी मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा गणपती जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, मानाचा तिसरा गुरूजी तालिम गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष
विकास पवार आणि मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष महेश सुर्यवंशी, शारदा गजानन गणपती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात तसेच इतर मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कृष्णकुमार गोयल म्हणाले की, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना ईश्वराकडे कल्याण आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते, त्याला मंगलाचरण म्हणतात. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पुणे फेस्टिव्हलतर्फे हा आगळा वेगळा ‘मंगलाचरण सोहळा’ आयोजित केला आहे. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, महापौर मंजुषा नागपुरे आणि पुणे फेस्टिव्हलचे जनरल सेक्रेटरी डॉ. सतीश देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.





















