१४ महागड्या दुचाकी जप्त
marathinews24.com
पुणे : मौजमजेसाठी उच्च शिक्षिताकडून दुचाकींची चोरी – मौजमजा करण्यासाठी पैसे हवे म्हणून ठिकठिकाणहून दुचाकींची चोरी करणाऱ्या उच्च शिक्षिताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे. चोरलेल्या दुचाकी फेसबुकवरील मार्केटप्लेसवर जाऊन तो नागरिकांना विक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून ८ लाख ५० हजार रुपये किमतीच्या तब्बल १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. महादेव शिवाजी गरड (वय २६, रा. मांजरी बु. हडपसर, मूळ- चाकूर लातूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
खोदकाम करताना खांब कोसळला, महाविद्यालयीन तरुणी जखमी – सविस्तर बातमी
गुन्हे शाखेचे युनिट पाच पथक हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पथकाने संशयातून महादेव गरड याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने आणखी तब्बल १२ होंडा युनिकॉर्न गाड्या चोरी केल्याची कबुली दिली. हडपसर परिसरातुन ६, काळेपडळ ३, चिखली, पिंपरी-चिंचवड २ सांगवी, पिंपरी-चिंचवड ३ या ठिकाणाहून त्याने १४ दुचाकी चोरल्याचे सांगितले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, अभिजीत पवार, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, अमित कांबळे, अकबर शेख, राजस शेख, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे, पृथ्वीराज पांडुळे, स्वाती तुपे, पल्लवी मोरे, तानाजी देशमुख, राहुल ढमढेरे, अविनाश इंगळे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमर चव्हाण, नासिर देशमुख, नेत्रिका अडसुळ यांनी केली.
आरोपी पदवीधर, फेसबुक मार्केटप्लेसवर करीत होता विक्री
आरोपी महादेव गरड हा पदवीधर असून, झटपट पैसे मिळवण्यासाठी त्याने दुचाकी चोरीचा सपाटा सुरु केला होता. ठिकठिकाणाहून दुचाकी चोरल्यानंतर तो फेसबुकवर मार्केटप्लेसद्वारे कमी किमतीत दुचाकींची विक्री करत होता. त्याने फेसबुकवर जाहिरात करून गाड्या विकल्या होत्या. फायनान्सचे हफ्ते थकीत झालेल्या नागरीकांची वाहने ओढून आणत, गाड्यांची विक्री करत असल्याचे तो ग्राहकांना सांगत होता. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत असल्याने दुचाकींची विक्री होत होती, असेही तपासात उघडकीस आले आहे.
मौजमजा करण्यासाठी पदवीधर चोरट्याकडून दुचाकींची चोरी केली जात होती. त्यानंतर अतिशय हुशारीने तो सोशल मीडियाचा वापर करून वाहनांची विक्री करत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक १४ दुचाकी जप्त केल्या आहेत. – पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे