पुण्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांचे बस्तान

पुण्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांचे बस्तान

बिष्णोई टोळीच्या हस्तकाचे पुणे कनेक्शन

marathinews24.com

पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून घेतली जाणारी खबरदारी उल्लेखनीय आहे. मात्र, दुसर्‍या बाजूला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांचे हस्तक पुण्यात बस्तान वाढवत असल्याचेही कारवायांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हिंदी चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील जुहू परिसरातील घरावर हल्लेखोरांनी १ फेबु्रवारीला पहाटेच्या सुमारास गोळीबार केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पुण्यातून चौघांना अटक केली आहे. अटकेतील चौघेही आरोपी आंतरराष्ट्रीय गँगस्टर बिष्णोई टोळीचा हस्तक शुभम लोणकरचे साथीदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यात १५ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला; स्वतःच कापली नाळ – सविस्तर बातमी

बिष्णोई टोळीचे पुण्यातील गुंडांशी असलेले कनेक्शन पुन्हा अधोरेखित झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून पुण्यात वावरणार्‍या काही सराईतांचा थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संपर्क वाढला आहे. मात्र, त्यांच्यावरील पोलिसांचा सर्वेलन्स कमी होत असल्याचेही दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्यांच्या हत्येचा कट पुण्यातील कर्वेनगर परिसरात असलेल्या लोणकर डेअरी व श्री बालाजी स्क्रॅप सेंटरमध्ये शिजला होता. बिष्णोई टोळीने जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी मुंबई गुन्हे शाखेने त्यावेळी शुभम लोणकर याचा भाउ प्रवीणला अटक केली होती. तो कर्वेनगरमधील भालेकर वस्तीवर दुधडेअरी चालवित होता.

सोशल मीडियाद्वारे शुभम आणि प्रवीण हे दोघेही लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संपर्कात आले होते. त्यानंतर बिश्नोई टोळीला हत्यारे पुरवल्याबद्दल शुभम लोणकर याला फेब्रुवारी २०२४ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची न्यायालयाने सुटका केली होती. आरोपी शुभम लोणकर अकोल्यातील अकोट या मुळ गावी राहायला होता. तर प्रवीण लोणकर हा भालेकर वस्तीवर लोणकर डेअरी दुकानातून दुग्धजन्य पदार्थांची विक्रीच्या नावाखाली भलतेच उद्योग करीत होता. प्रवीणने सिद्दिकी हत्याकांडातील हल्लेखोरांची जमवाजमव केली होती. त्याच्याकडे परराज्यातून आलेल्या दोघांना त्याने काम मिळवून देत विश्वास संपादित केला होता.

सिद्ध मुसेवाला हत्याकांडातही होते पुणे कनेक्शन

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या लॉरेन्स बिश्नोई गँगने केली होती. संबंधित प्रकरणात पोलीसांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव, जुन्नर तालुक्यातील नवनाथ सुर्यवंशी, सिद्धेश कांबळे यांना अटक केली होती. हे तिघेहा सोशल मीडियातील पोस्टमुळे प्रभावित होऊन बिश्नोई गँगशी जोडले गेले होते. गुजरातमध्ये तुरुंगात असलेला लॉरेन्स बिष्णोई तर परदेशात असलेले त्याचे साथीदार अनमोल बिश्नोई आणि गोल्डी ब्रार हे सोशल मीडियाद्वारे तरूणांची माथी भडकावून त्यांना गँगमध्ये सहभागी करून घेतात. देशाच्या विविध राज्यात गँगने नेटवर्क उभे केले असून, त्यांच्याकडून सिने अभिनेते, राजकारण्यांना धमकावले जात असल्याचे तपासावरून स्पष्ट झाले आहे.

रीलस्टार ते बिष्णोई टोळीचा मोहरा

बिष्णोई टोळीतील गुंड शुभम लोणकर हा वारजे परिसरात ‘रील भाई ‘ म्हणून स्थानिकांमध्ये परिचित होता. त्याचे बड्या गँगस्टरसोबत संबंध असावेत, अशी शंका कुणालाही नव्हती. प्रत्यक्षात तो गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई व त्याचा भाऊ अनमोल यांच्या संपर्कात होता. त्याला यापूर्वी बेकायदा पिस्तूल बाळगल्याबद्दल अकोला पोलिसांनी अटक केली होती. त्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तो फरारी झाला. बिष्णोई टोळीतील गुंडांनी त्याला पंजाब, हरियाणामध्ये आश्रय दिला. त्याकाळात, अनमोल बिष्णोई याने त्याला सिद्दीकी यांना ठार मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचे तपासात उघडकीस आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×