डेक्कन पोलिसांनी केली टोळक्याला अटक
marathinews24.com
पुणे – पैशांच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण करीत त्याला बेदम मारहाण करीत जखमी करणार्या टोळक्याला डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना ७ ते ८ सप्टेंबर कालावधीत जंगली महाराज रोड ते पिंपळे गुरव यादरम्यान घडली आहे. टोळक्याने मोटारीतून संबंधित तरुणाचे अपहरण करीत त्यांच्या दंडावर शस्त्राने वार केला केला. त्यानंतर त्यांच्याकडील किंमती ऐवज काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे.
सोसायटीच्या आवारात अडीच लाखांची रोकड हिसकावली – सविस्तर बातमी
गौरव रमेश कांबळे (वय ३० रा. गंजपेठ)समीर सुनील मेहता (वय ३८, रा. शुक्रवार पेठ) रियान रफिक शेख (वय ५४ रा. गंजपेठ) संदीप निवृत्ती गावडे (वय ४५, रा. गंजपेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. संदीप सिताराम मेंगडे (वय ३६ रा. शिवणे, पुणे ) असे अपहणातून सुटका झालेल्याचे नाव आहे. त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संदीप मेंगडे हे शिवणे परिसरात राहायला असून, आरोपींपैकी एका सोबत त्यांचे आर्थिक देवाण-घेवाण झाली होती. त्यामुळे टोळक्याने त्यांना ७ सप्टेंबरला जंगली महाराज रोड परिसरात बोलावून घेत मारहाण केली. त्यामुळे टोळक्याने त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून गंजपेठ परिसरात नेउन अपहरण केले. त्याठिकाणी त्यांना मारहाण करीत दोन मोबाइल, चांदीची चैन, पैशांचे पाकिट काढून घेतले. त्यानंतर टोळक्याने पुन्हा त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून पिंपळे गुरव परिसरात नेउन मित्राच्या घरी मारहाण केली. आरोपी गौरव कांबळे याने संदीपच्या दंडावर शस्त्राने वार करून जखमी केले. त्यामुळे तक्रारदार आरडाओरड करु लागल्याने टोळक्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रणजितसिंग परदेशी तपास करत आहेत.






















