सातारा रस्ता; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
marathinews24.com
पुणे – Pune Metro Traffic Problem : शहरातील सातारा रस्त्यावर मेट्रोच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ता अडविण्यात आल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे. त्यातच सिटी प्राइड थिएटरसमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावरील एक मार्गिका पार्किंगमुळे अडविली जात असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही या प्रकाराकडे स्वारगेट वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक – सविस्तर बातमी
सातारा रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. रस्त्याचा मोठा भाग कामासाठी वापरला जात असल्याने वाहनांच्या ये-जा करण्यासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहे. या परिस्थितीत वाहतुकीचे नियोजन आणि रस्त्यावरील उपलब्ध जागेचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. मात्र, सिटी प्राइड थिएटरसमोरच वाहने बेकायदा उभी केली जात असल्याने वाहतुकीसाठी असलेली जागा आणखी कमी होत आहे. थिएटरसमोरील रस्त्याचा भाग आधीच अरुंद आहे. त्यात रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीची एक मार्गिका अडविली जाते. परिणामी, या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनांना उपलब्ध असलेल्या कमी जागेतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावण्याची आणि कोंडी होण्याची शक्यता वाढते. मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेल्या मर्यादित जागेतून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान असताना बेशिस्त पार्किंगमुळे त्यात आणखी भर पडत आहे.
रस्त्यावरील उपलब्ध जागा कमी झालेली असताना वाहने कुठेही उभी करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. विशेषतः मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल केलेल्या मार्गांवर बेशिस्त पार्किंग रोखण्यासाठी नियमित गस्त आणि कारवाईची गरज आहे. मात्र, सिटी प्राइड थिएटरसमोरील परिस्थिती पाहता या ठिकाणी वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते. स्वारगेट वाहतूक विभागाने या ठिकाणी लक्ष देऊन बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी आणि वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली मार्गिका मोकळी ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.























