पोलीस, पीएमपीएल प्रशासन ढिम्म
marathinews24.com
पुणे – शहरातील नागरिकांची प्रवासवाहिनी असलेल्या पीएमपीएल बसमधून महिलांचा प्रवास धोकेदायक झाल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. प्रामुख्याने गर्दीचा फायदा घेउन लुटारू टोळीकडून जेष्ठ महिलांसह नोकरदार महिलांना लक्ष्य करीत दागिने चोरून नेले जात आहे. वर्दळीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी गलका करीत टोळके महिलांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या, गळ्यातील मंगळसूत्र, पर्समधील दागिन्यांची चोरी करीत आहेत. त्यामुळे पीएमपीएल बसमधील प्रवास नको गं बाई अशी म्हणण्याची वेळ महिलांवर आली आहे.
पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी तरूणीसह जेष्ठ महिलेचे दागिने चोरून नेले आहेत. चोरट्यांनी दोन्ही घटनेत पावणेदोन लाखांचे दागिने चोरून नेले आहेत.त्यामुळे महिलांमध्ये बसप्रवासातही धास्ती निर्माण झाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बसमध्ये होणार्या वारंवार चोरीच्या घटनांमुळे पीएमपीएल प्रशासनाकडून महिला सुरक्षिततेसंदर्भात कोणतेही उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून आले आहे. चोरीप्रकरणी बंडगार्डन आणि स्वागरेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खाऊ घेऊन येत असताना कार चालकाने मुलाला चिरडले – सविस्तर बातमी
बसने निगडी ते पुणे स्टेशन असा प्रवास करणार्या ३३ वर्षीय महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी तब्बल १ लाख १७ हजार रूपयांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना १८ एप्रिलला दुपारी बाराच्या सुमारास घडली असून, महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रूपीननगर तळवडे परिसरात राहायला असून, कामानिमित्त पीएमपीएल बसने १८ एप्रिलला प्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या पर्सवर डल्ला मारला. पर्समधील जवळपास सव्वा लाख रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पुणे स्टेशनवर उतरताच बंडगार्डन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करीत आहेत.
जेष्ठ महिला स्वारगेट पीएमपीएल बसस्थानकातून निगडीच्या दिशेने जाणार्य बसमध्ये शिरत असताना चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या पाटलीवर डल्ला मारला आहे. महिलेच्या हातातील ५० हजार रूपये किंंमतीची सोन्याची पाटली चोरून नेली. ही घटना ११ एप्रिलला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट स्थानकाजवळ घडली आहे. तक्रारदार ६६ वर्षीय जेष्ठ महिला बोपोडीत राहायला असून, कामानिमित्त स्वारगेटला आल्या होत्या. त्यानंतर घरी जाण्यासाठी बसमध्ये प्रवेश करीत असताना चोरट्यांनी गलका करीत गोंधळ केला. महिलेच्या हातातील सोन्याची पाटली काही सेंकदात कापून नेली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कस्पडे तपास करीत आहेत.
पोलीस, पीएमपीएल प्रशासनाला जाग कधी येणार
पीएमपीएल बसप्रवासात सातत्याने महिलांचे दागिने चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, तरीही स्थानिक पोलिसांसह पीएमपीएल प्रशासनाला देणेघेणे नसल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी किमान महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणांवर वॉच ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्यासोबत पीएमपीएल प्रशासनाने खात्यातंर्गत सुरक्षारक्षकांची नियुक्ती केल्यास, चोरट्यांचा अटकाव होण्यास मदत होणार आहे. प्रत्यक्षात मात्र, स्वारगेट, खडकी, डेक्कन, हडपसर यासह महत्वाच्या बसस्थानकात होणार्या चोर्या रोखण्यासाठी पोलीस आणि पीएमपीएलकडून ठोस उपाययोजना राबविली जात नसल्याचे दिसून आले आहे.