आर्थिक फसवणूकीचे प्रकरण
marathinews24.com
पुणे – आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या पोलिस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली. गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड, पुणे) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे.
पुण्यात १५ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला; स्वतःच कापली नाळ – सविस्तर बातमी
जगताप याच्यावर भारती विद्यापीठ, चतुःश्रृंगी आणि कोथरुड पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. रविवारी (दि.८ ) दुपारी त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने अकरा फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सद्या तो पोलिस खात्यातून निलंबीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्लर व्यवसायिक महिलेची अडिच लाखाहून अधिक रोकड, सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिणे घेऊन फसवणूक केली होती. घरच्यांच्या आजारपनाचा बहाणा करून, तसेच मुलीच्या शिक्षणाचे कारण सांगून त्याने ही फसवणूक केली होती. याप्रकरणी, भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार जगताप याच्यावर गुन्हा दाखल केला होता. तर यापुर्वी देखील जगताप याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात एका महिलेचे ७३ तोळे सोने आणि १७ लाख रुपये रोख घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा जुलै महिण्यात दाखल झाला होता. दरम्यान २१ ऑगस्ट २०२४ मध्ये जगताप याची पोलिस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. मात्र हजर न राहता त्याने यादरम्यान आणखी एका सराफाला गंडा घातला. पुण्यातील औंध भागात असलेल्या एका सराफी व्यावसायिकडून जगतापने पोलिस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले होते.
घटनेमुळे विशेष शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप यांचे निलंबन केले होते. दरम्यानच्या कालावधीत जगताप शहारातून फरार झाला होता. त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल असलेले पोलिस ठाण्याची पथके मागावर होती. दोन दिवसापुर्वी भारती विद्यापीठ पोलिसांना जगताप आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील फुलपथरु गावात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त मिलींद मोहीते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलिस अंमलदार मंगेश गायकवाड यांच्या पथकाने रविवारी (दि.8) दुपारी जगताप याला ताब्यात घेतले. जगताप हा एका भाड्याच्या सदनिकेत तेथे वास्तव्यास होता. तो फुलपथरू गावातील एका मंदीरात अधून-मधून दर्शनाला येत होता. पोलिसांनी गावात पोहचल्यानंतर त्या मंदीरातील पुजाऱ्याला जगताप याचा फोटा दाखविला. त्यावेळी तो राहत असलेली सदनिकाला पोलिसांना सापडली. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
यापुर्वी देखील पोलिसांनी जगताप याला अटक केली होती. राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी त्याने खोटी कागदपत्रे सादर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. २०२१ मध्ये सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस दलातील गणेश जगताप सह दोन लिपिकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.
आर्थिक फसवणूकीचा गणेश जगताप याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो चार पाच महिन्यापासून फरार झाला होता. त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला आंध्रप्रदेशातून अटक केली आहे.
मिलींद मोहीते, पोलिस उपायुक्त पुणे शहर






















