सायबर गुन्हेगारीचा कहर; पुण्यात ३ फसवणुकीच्या घटना, ७६ लाखांचा चुना
marathinews24.com
पुणे – शहरातील तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल फसवणुकींच्या गुन्ह्यांमध्ये तिघांची ७६ लाख २४ हजार ९० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत सायबर चोरट्यांनी आंबेगाव खुर्द परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेचा विश्वास संपादन करून रेटिंगद्वारे जास्त नफा मिळवून देण्याच्या नावाखाली १४ लाख २५ हजार ४९० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आंबेगाव पोलिस ठाण्यात विविध मोबाईल नंबर धारकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ जुलै ते १४ जुलै २०२४ दरम्यान घडली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिणे करत आहेत.
एटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी
गॅरेन्टेड रिटर्न देण्याचे आमिष दाखवून ५८ लाखांना फसवले
सेबीचा पीएमएस पाहण्याचा परवाना असल्याचे आधी दाखवले. त्यानंतर मोबाईलमध्ये पोर्ट फोलिओ म`नेजमेंट सर्व्हिस लायसन्स दाखवून कात्रज येथील ४९ वर्षीय तक्रारदाराची शेअर्स खरेदी करण्याची माहिती मिळणार असल्याचे सांगितले. याशिवाय गुंतवणुकीवर गॅरेन्टेड रिटर्न देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. तक्रारदाराने तिघा आरोपींवर विश्वास ठेवून पैसे गुंतवले, त्यानंतर त्यांची ५८ लाख ३०
हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात रवींद्र बाळू भारती (३६, रा. मगरपट्टा), अमोल निवृत्ती वागज (३२, रा.लोणी काळभोर) आणि चेतन अनिल गादेकर (३०, बिबवेवाडी, सिद्धार्थनगर) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ही घटना फेब्रुवारी २०२४ ते ३१ मे २०२४ दरम्यान घडली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण करत आहेत.
डेबिट कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने ३ लाखांची फसवणूक
कोंढव्यातील ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मोबाईल नंबर वापरकर्त्याने फोन केला. त्याने फोनवर डेबिट कार्ड सुरू करून देतो अशी थाप मारली. ज्येष्ठाकडून बँकेचे अकाउंट डिटेल्स घेत त्यांच्या बँक खात्यातून आरोपीने ३ लाख ६८ हजार ६०० रुपये काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार १५ मार्च रोजी घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक शेख करत आहेत.