दुचाकीस्वार तरुण जखमी
marathinews24.com
पुणे – Pune Road Accident : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात घडली. याप्रकरणी डंपर चालकाला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली. माधुरी सतीश जाधव (वय २३, रा. लक्ष्मी निवास, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार अभिजित ज्ञानदेव जाधव (वय ३१, रा. श्री तुळजा भवानीनगर, खराडी) जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डंपर चालक मनोहर रामदास हाके (वय २९, रा. दत्तवाडी, उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत अभिजित जाधव यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून खून – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अभिजित आणि त्याची मैत्रीण माधुरी हे खासगी नोकरी करतात. शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी पावणेदहाच्या सुमारास दुचाकीस्वार अभिजित आणि माधुरी हे हडपसर-सासवड रस्त्याने निघाले होते. फुरसुंगीतील पाॅवर हाऊसजवळ भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. डंपरच्या चाकाखाली दुचाकीवरील सहप्रवासी माधुरी सापडली. अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार अभिजित याला दुखापत झाली. अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालक हाके याला पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.























