पोलिसांसह तपास पथकांना काम वाढविण्याचे प्रकार वाढले
marathinews24.com
पुणे – शहरासह ग्रामीण भागात दरोड्यासह अपहरणाचे कुभांड रचून थेट पोलिसांनाच कामाला लावले जात असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. विशेषतः आपल्यावर आलेली वेळ निभावण्यासाठी पोलिसांसह तपास पथकांचा उपयोग करून घेतला जात आहे. दरम्यान, अशा घटनांचा थरार, व्हिडिओचे जाणूनबुजून चित्रीकरण करीत व्हायरलही केले जाते. त्यामुळे घटना खरीच असल्याचे भासवून तक्रारदाराकडून पोलिसांनाच वेळोवेळी विचारणा केली जाते. अखेर तपासाअंती सर्व काही कटाचा भाग असल्याचे उघडकीस येत असून, त्यानंतर मात्र पोलिसांकडून संबंधितावर गुन्हा दाखल केला जात आहे.
तक्रारदारांकडून नानाविध अडचणींपासून सुटका होण्यासाठी वेगवेगळे नाट्य रचले जाते. त्यासाठी पत्नीसह इतर नातलगांनाही सहभागी करून घेतल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. आर्थिक तोटा झाल्याप्रकरणी स्वतःच्या अपहरणाचा कट रचणे, लोकांचे पैसे देण्याचे चुकावेत यासाठी थेट स्वतःच्या ज्वेलर्सवर नातलगांच्या मदतीने दरोडा टाकणे, स्वतः गुन्हा केल्यानंतरही फिर्यादी होउन पोलिसांचीच दिशाभूल करणे, खून, खूनाचा प्रयत्न करीत साळसूदपणाचा आव आणण्याचे पोलिसांच्या तपासाअंती उघडकीस आले आहेत. दरम्यानच्या काळात संबंधित गुन्ह्याची तीव्रता कमी होणे, तपासादरम्यान पोलिसांचा मनस्ताप वाढणे, इतर आरोपी पसार होण्याची शक्यता वाढत असल्याचेही दिसून आले. काही तक्रारदारच आरोपी असल्याचे घटनांवरून स्पष्ट झाले आहे. अशा काही घटना पुणे ग्रामीणसह शहरात घडल्या असून, त्यासंदर्भात पोलिसांनी संबंधितांविरूद्ध कारवाईही केली आहे.
कर्जबाजारी झाल्याने सराफानेच स्वतःच्या ज्वेलर्सवर दरोड्याचा बनाव रचल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात सराफी पेढीवर खेळण्यातील पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकून दागिने लूटीची घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध पथकाने तातडीने तपासाला गती देउन आरोपींचा माग काढण्यास प्राधान्य दिले होते. गुन्हे शाखेने दोन जणांना भोसरीतून अटक केली होती. चौकशीत सराफी पेढीच्या मालक कर्जबाजारी झाल्याने देणेकर्याचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने चुलतभावाच्या मदतीने सराफी पेढीवर दरोडा टाकण्याचा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चुलतभावाला अटक करण्यात आली आहे ‘श्री ज्वेलर्स’सराफी पेढीवर मंगळवारी (१५ एप्रिल) भरदिवसा दरोडा पडल्याची घटना घडली होती. सराफी पेढीचा मालक आणि कर्मचार्याला खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून २२ तोळ्यांचे दागिने लुटून चोरटे पसार झाले होते.
हिरे व्यापार्यानेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव
कर्जबाजारी झाल्याने हिरे व्यापार्यानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचेही उघडकीस झाले आहे. २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापार्याच्या अपहरण प्रकरणाला वेगळेच वळण लागले. कर्जबाजारी झाल्याने देणेकर्यांकडून होणार्या त्रासामुळे त्याने अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली. संबंधित व्यापारी बिबवेवाडी भागातील सोसायटीत राहायला आहे. व्यापारी आणि त्याची पत्नी मुलीला शाळेतून घेऊन सोसायटीत आले. त्यानंतर त्याने पत्नीला लष्कर भागात कामानिमित्त निघाल्याचे सांगून दुचाकीवरुन प्रवास सुरू केला. काही वेळानंतर व्यापार्याच्या पत्नीच्या मोबाइलवर अज्ञाताने संपर्क साधला. तुमच्या पतीचे २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर व्यापार्याची दुचाकी बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात सापडल्याने गूढ वाढले होते. तपासासाठी बंगळुरू आणि मुंबईत पोलिसांची पथके रवाना झाली होती. दरम्यान, देणेकर्यांच्या त्रासामुळे मी नवले पूल परिसरातून रावेतला गेलो. तेथून नवी मुंबईतील कळंबोलीत गेलो. मुंबई सेर्ट्ल, खारमध्ये दोन दिवस लॉजमध्ये वास्तव्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
तक्रारदारच निघातेय आरोपी
गुन्हा केल्यानंतर काहीजणांकडून पोलीस ठाण्यात धाव घेउन स्वतःच तक्रार दाखल केली जाते. त्यानंतर पोलिसांनी तपास करावा, आम्हाला न्याय द्यावा अशापद्धतीची मागणी केली जाते. मात्र, विविध बाजूंनी तपास केल्यानंतर संबधित काही गुन्ह्यात तक्रारदराच आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, खबर्यांच्या माहितीनुसार आरोपींविरूद्ध पुरावे गोळा होताच, पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यामुळे चोर अन आरोपी कितीही हुशार असला, तरीही पोलिसांकडून सत्य शोधलेच जाते. हे अनेक घटनांतील तपासावरून दिसून आले आहे.