आर्थिंक विवंचेने तरुणाने संपवले जीवन; अभ्यासाच्या ताणातून विद्यार्थिनीने दिला जीव
marathinews24.com
पुणे – शहरात एकाच दिवशी तरुणासह विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या तरुणाने आर्थिंक विवंचनेमुळे मध्यवर्ती नारायण पेठेत गळफास घेउन जीवन संपवले आहे. तर अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थिंनीने कात्रजमध्ये इमारतीच्या १० मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुण्यात ५० हजारांची लाच घेणारा सहायक पोलीस निरीक्षक अटकेत – सविस्तर बातमी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परिक्षांची तयारी करणार्या तरुणाने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.९) नारायण पेठ परिसरात घडली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख ( वय २५, मूळ रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. मागील दीड ते दोन वर्षांपासून तो पुण्यामध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र, सततची आर्थिक टंचाई आणि स्वतःवर झालेल्या कर्जामुळे प्रथमेश नैराश्यात होता. मागील काही महिन्यांपासून तो राहत असलेल्या नारायण पेठेतील राहत्या खोलीचे भाडे थकले होते. त्यामुळे खाण्यासह इतर खर्चामुळे त्याने ओळखीच्या लोकांकडून उसनवारी केली होती. परिक्षांचा अभ्यास करताना घेतलेल्या उसनवारीत त्याच्यावर अडीच लाख रुपयांचे कर्ज झाले होते. परिस्थितीमुळे त्याने स्पर्धा परीक्षा सोडून गावी परत जाण्याचा विचारही काही मित्रांजवळ बोलून दाखवला होता.
तत्पूर्वीच प्रथमेशने खोलीत गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडली आहे. त्यामध्ये प्रथमेशने आर्थिक अडचणींचा आणि घेतलेल्या कर्जाच्या व्यवहारांचा उल्लेख केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ग्रामीण भागातून येउन पुण्यात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करीत अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगलेल्या तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये आर्थिंक विवंचेनेमुळे कमालीचे नैराश्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या विद्यार्थीनीने संपवले जीवन
वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीने इमारतीच्या १० मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले आहे. आदी माया शेखर रेड्डी (वय २१ रा. फ्लॅट नंबर १००२ नॅन्सी लेक होम सोसायटी कात्रज, पुणे मूळ- विक्रमपुरी कॉलनी रेनबो हॉस्पिटल मागे तिरूमलंगरी कारखाना हैदराबा, तेलंगणा ५००००९ ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार तिने अभ्यासाच्या ताणातून आत्महत्येसारख्या टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदीमाया रेड्डी मूळची हैद्राबादमधील असून, पुण्यात एका वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. मंगळवारी तिने राहत असलेल्या कात्रजमधील नॅन्सी लेक होम सोसायटीच्या १० मजल्यावरुन उडी मारली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव हे पथकसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिच्या शरीरातून रक्त वाहलेले दिसत नव्हते. तिचा भाऊ घटनास्थळी हजर होता.पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता, दोघेही बहीण-भाउ कात्रज परिसरात एकत्र राहत असल्याचे त्याने सांगितले. ते मूळचे हैद्राबादमधील असून, शिक्षणासाठी पुण्यात राहत असल्याचे त्याने स्पष्ट केले. आदीमायाचे कोणासोबत भांडण नव्हते. तिची परिक्षा सुरू असल्यामुळे ताण आला असावा. त्यामुळे तिने स्वतः आत्महत्या केली असल्याची माहिती भावाने दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.






















