तीन दिवसांत १७१ जणांवर कारवाईच्या जाळ्यात
marathinews24.com
पुणे – शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालवणार्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, २४ ते २६ एप्रिल कालावधीत तब्बल १७१ मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्ताविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे.
भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार, गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत बेदरकारपणे वाहने दामटणार्यांसह मद्यधुंद वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाने नाकाबंदी केली आहे. ठिकठिकाणी ३३ नाकाबंदी पॉईंट उभारून वाहनांची तपासणी केली जात असून, त्याठिकाणी ब्रेथ अॅनालायझरच्या मदतीने वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणार्या चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईसह पुढील कायदेशीर प्रक्रिया केली आहे
अपघातांचे प्रमाण करणे, बेशिस्तांना धडा
अपघातांचे प्रमाण कमी करणे, रस्ते सुरक्षितता वाढवणे आणि नागरिकांमध्ये जबाबदार वाहन चालकाची जाणीव निर्माण करणे हा कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. वाहन चालकांनी मद्यपान करून वाहन चालवणे टाळावे, विरूद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे वाहन चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध वाहतूक विभागाकडून सातत्याने कारवाई करून दंड केला जात आहे. प्रामुख्याने मद्यपान करून वाहन दामटणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्याविरूद्ध ही मोहिम राबवली जात आहे. नियमांचे पालन करून स्वतःसह इतरांची काळजी घ्यावी.
हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग
























