आज बंडा जोशींच्या ‘हास्यपंचमी’ कार्यक्रमाचे आयोजन
marathinews24.com
पुणे – सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवात प्रसिद्ध विनोदी कलाकार बंडा जोशी यांच्या ‘हास्यपंचमी’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सहकारनगर क्रमांक २ येथील सहजीवन गणेश मंदिर मंडपात रंगणार असून रसिकांसाठी तो पूर्णपणे विनामूल्य खुला आहे.
मराठीतील खुसखुशीत विनोद, मिश्किल शैली, दैनंदिन जीवनातील प्रसंगांवर आधारित हलके-फुलके सादरीकरण आणि दर्जेदार हास्याचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणेकरांना मिळणार आहे. बंडा जोशी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण विनोदी शैलीमुळे हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्ट दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. यंदाही शास्त्रीय संगीत, सांस्कृतिक सादरीकरणे, व्याख्याने आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची समृद्ध मेजवानी पुणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘हास्यपंचमी’चे आयोजन करण्यात आले आहे.
या सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष राजेश दातार, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष सुयश साबडे आणि कार्याध्यक्ष मदन कटारिया यांनी ही माहिती दिली. त्यांनी पुणेकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या हास्यसोहळ्याचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
रसिकांसाठी कार्यक्रम विनामूल्य असल्याने अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून सांस्कृतिक महोत्सवाची शोभा वाढवावी, असेही त्यांनी सांगितले.





















