वारजे पोलिसांकडून गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – संगीत रजनीच्या तिकिट विक्रीतून मिळालेले पेैसे आयोजकांना न देता फसवणूक केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजस अतुलकुमार उपाध्ये (वय ३१) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोरया एंटरटेनमेंट एलएलपीचे संचालक विशाल गारगोटे यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षा प्रवाशाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरया एंटरटेनमेंट एलएलपी कंपनीकडून विशाल गारगोटे यांनी गेल्या वर्षी २१ सप्टेंबरला कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन येथे एका प्रसिद्ध हिंदी गायकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. काही कारणास्तव या कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी राजस उपाध्ये यांच्याकडे सोपविले. याबाबत त्यांच्यात सामंजस्त करार झाला होता. तिकीट विक्रीतून मिळालेले पैसे राजस उपाध्ये यांना देण्यात येणार होते.
ऑनलाइन पद्धतीने झालेल्या तिकीट विक्रीचे पैसे हे मोरया एंटरटेनमेंटच्या खात्यावर जाणार होते. ऑनलाइन तिकिट विक्रीतून मिळालेली रक्कम राजस उपाध्ये यांना देण्यात यावी, असे करारात नमूद करण्यात आले होते. १४ लाख १७ हजार ११३ रुपये हे मोरया एंटरटेनमेंटने देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी उपाध्ये यांना पैसे दिले नाहीत. उपाध्ये यांना देण्यात आलेला धनादेश वटला नाही. उपाध्ये यांनी करारानुसार पैशांची मागणी केली. तेव्हा गारगोटे यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली, असे उपाध्ये यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक तरडे तपास करत आहेत.