गुलजार-ए-रजा ट्रस्टविरोधात माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
बीड (अनंत जाधव)-धार्मिक कार्याच्या नावाखाली जनतेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करून बँक,आयकर विभाग व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुलजार-ए-रजा या बनावट ट्रस्टच्याविरोधात दहशतवाद विरोधी एटीएस पथकाने छत्रपती संभाजीनगर युनिटच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात ट्रस्टच्या चार विश्वस्तांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये कायदेशीर कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झालेल्यापैकी एकाला काल धारूर तर दुसऱ्याला केजमधून अटक केली आहे. तर दोघे फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण – सविस्तर बातमी
ट्रस्टच्या ५ बँक खात्यात तब्बल ४ कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपये मिळून आले आहेत. यावरूनच आता पुन्हा एकदा बीड एटीएसच्या रडारवर आल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील विविध ट्रस्ट व एनजीओंची माहिती संकलित करत असताना गुलजार-ए-रजा हा ट्रस्ट संशयाच्या भोवऱ्यात आला. या ट्रस्टची स्वतंत्र वेबसाईट तसेच माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील पत्ता आढळून आला. वेबसाईटवर अक्सीस बँकेचे खाते क्रमांक देऊन जनतेकडून डोनेशन स्वीकारले जात असल्याचे निदर्शनास आले. अक्सीस बँक, मार्केटयार्ड शाखा, लातूर येथे चौकशी केली असता गुलजार-ए-रजा ट्रस्टच्या नावाने एकाच कस्टमर आयडीवर एकूण पाच बँक खाती उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांमधून जनतेकडून प्राप्त होणारा निधी थेट जमा होत असल्याची खातरजमा तपास अधिकाऱ्यांनी स्वतः व्यवहार करून केली.
बँकेतील केवायसी कागदपत्रांची पडताळणी केली असता ट्रस्टच्या नोंदणी क्रमांकात गंभीर तफावत आढळून आली. ट्रस्टने वापरलेला नोंदणी क्रमांक हा प्रत्यक्षात अन्य संस्थेचा असल्याचे स्पष्ट झाले. तसेच धर्मादाय आयुक्त।कार्यालयाकडे चौकशी केली असता गुलजार- ए-रजा ट्रस्ट महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत नसल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले. याशिवाय ट्रस्टने दर्पण पोर्टल, आयकर विभाग व बँकेत वेगवेगळे आणि बनावट नोंदणी क्रमांक वापरून कागदपत्रे सादर केल्याचे तपासात उघड झाले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे पॅनकार्ड काढून आयकर विभागाची फसवणूक केल्याचाही प्रकार समोर आला आहे. तपासात असेही निष्पन्न झाले की, करचुकवेगिरीच्या उद्देशाने खोटे बँक विवरणपत्र आयकर विभागाकडे सादर करण्यात आले. या बनावट ट्रस्टच्या नावाने अक्सीस बँकेतील पाच खात्यांमध्ये एकूण ४ कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपये जमा झाल्याचे समोर आले असून हा संपूर्ण निधी धार्मिक कार्याच्या नावाखाली जनतेकडून गोळा करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी गुलजार-ए-रजा ट्रस्टचे अध्यक्ष इम्रान शेख कलीम शेख, उपाध्यक्ष सय्यद मुजम्मिल सय्यद नूर, सचिव अहमदुद्दीन कैसर काझी व विश्वस्त तौफिक जावेद काझी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३३५, ३३६(२), ३४० अन्वये सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. काल छ.संभाजीनगर येथील एटीएसच्या पथकाने माजलगावमध्ये येवून ही कारवाई केली आहे. माजलगाव ग्रामीणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हा दाखल असलेल्यांपैकी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी एकाला धारूर तर दुसऱ्याला केजमधून ताब्यात घेतले आहे.
कारवाईत एटीएसच्या पथकाला माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालक कोळी आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याच प्रकरणावरून आता पुन्हा एखदा बीड एटीएसच्या रडारवर आल्याचे पहायला मिळत आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.




















