मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – धान्याच्या दुकानात उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून दोन ग्राहकांनी दुकानदाराला आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण केल्याची घटना मुंढव्यातील केशवनगर परिसरात घडली. आरोपींनी दुकानातील धान्याची पाटी डोक्यात मारून दुकानदाराला जखमी केले असून मुढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र दुर्गाराम प्रजापती (वय २६) आणि दिनेश दुर्गाराम प्रजापती (वय २८) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत केवलराम पटेल (वय २२, रा. मांजरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
दुचाकी घसरल्याने अपघातात तरूण ठार, एकजण जखमी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे मुढव्यातील केशवनगर येथे ‘श्री बालाजी फूड ट्रेडर्स’ नावाचे दुकान आहे. आरोपींनी दुकानातून काही माल उधारावर नेला होता. फिर्यादी आणि त्यांचा भाऊ दिलीप पटेल हे उधारीचे पैसे घेण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. “आम्ही पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही,” असे फिर्यादींनी सांगितल्याने आरोपींनी संतापून त्यांना मारहाण केली. एका आरोपीने दुकानातील लोखंडी पाटीने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. हा प्रकार दि. २० एप्रिलला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास केशवनगर येथील श्री बालाजी फुड टेडर्स दुकानात घडला.
पीएमपीएमएल बसमध्ये राडा; धक्का लागल्याने प्रवाशाला दगडाने मारले
पीएमपीएमएल बसमध्ये चढताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन अनोळखी इसमांनी एका प्रवाशाला बसमधून खाली खेचून दगडाने मारहाण केल्याची घटना विमानतळ परिसरात घडली आहे. विमानतळ पोलिसांनी तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बालाजी अय्यप्पा गुत्तेदार (वय २७, रा. लोहगाव, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बालाजी हे विमाननगर चौकातील बस स्टॉपवरून बसमध्ये चढत असताना मागून येणाऱ्या तीन व्यक्तींचा त्यांना धक्का लागला. यावरून आरोपींनी बालाजी यांच्याशी हुज्जत घातली. आरोपींनी त्यांना बसमधून खाली ओढले आणि तिथेच धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. आरोपींपैकी एकाने जवळ पडलेला दगड उचलून बालाजी यांच्या डोक्यात मारला, ज्यामुळे ते जखमी झाले. मारहाण केल्यानंतर तिन्ही आरोपी तिथून पळून गेले.





















