दुकानदाराकडून खंडणी न मिळाल्याने हल्ला, हल्लेखोर गजाआड, लष्कर भागताील घटना
Marathinews24.com
पुणे – दुकानदाराला दरमहा १० हजार रुपये हप्त्याची मागणी करुन वस्ताऱ्याने वार केल्याची घटना लष्कर भागात घडली. वस्तारा उगारून दहशत माजविणाऱ्या तरुणाला लष्कर पोलिसांनी अटक केली. आफताब अब्दुल शेख उर्फ अप्पी (वय २४, रा. गल्ली क्रमांक १०, भीमपूरा, लष्कर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत जाकिर ताजिउद्दीन कुरेशी (वय ५५, रा. व्ही. पी. स्ट्रीट, भोपळे चौक, लष्कर ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कुरेशी यांचे लष्कर भागातील व्ही. पी. स्ट्रीट परिसरात दुकान आहे. आरोपी शेख बुधवारी (९ एप्रिल) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास कुरेशी यांच्या दुकानात गेला. त्याने कुरेशी यांच्याकडे दरमहा १० हजार रुपये हप्ता मागितला. कुरेशी यांनी त्याला नकार दिल्यानंतर त्याने त्यांच्यावर खिशात ठेवलेला वस्तरा उगारला. हप्ता न दिल्यास व्यवसाय करुन दिला जाणार नाही, अशी धमकी देऊन त्याने कुरेशी यांच्या डाव्या हाताच्या बोटावर वस्ताऱ्याने वार केला. त्यानंतर शेखने वस्तरा उगारून परिसरात दहशत माजविली. शेखला पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे तपास करत आहेत.