भरतनाट्यम्‌ नृत्याविष्कारातून साकारली ‘श्रीराम-कथा’

भरतनाट्यम्‌ नृत्याविष्कारातून साकारली ‘श्रीराम-कथा’

दाक्षिणात्य भरतनाट्यम्‌ आणि मराठी गीतरामायणाचा सुरेल संगम; पुणेकर मंत्रमुग्ध

marathinews24.com

पुणे – दाक्षिणात्य भरतनाट्यम्‌ नृत्यशैली अन् मराठी भाषेतील गौरवास्पद गीतरामायण यांच्या नयनरम्य सांगीतिक मिलाफातून रामकथा साकारण्यात आली. शब्द, सूर, ताल आणि लयबद्ध नृत्य याचा सुरेख संगम पुणेकरांनी अनुभवला. निमित्त होते भरतनाट्यम्‌ द्वारा उलगडलेल्या ‘श्रीराम-कथा’ या कार्यक्रमाचे. नृत्यपूजा अकादमीच्या प्रख्यात भरतनाट्यम्‌ नृत्यांगना अनिता नेवे यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात स्वतः नृत्यांगना अनिता नेवे आणि त्यांच्या ४० विद्यार्थी नृत्यांगना यांनी सादरीकरण केले. गदिमा यांचे चिरंजीव आनंद माडगूळकर, चित्रपट निर्माते डॉ. अजय सरपोतदार, नगरसेविका मुक्ता जगताप आदी उपस्थित होते. विमाननगरयेथील सिंबायोसिसच्या ऑडिटोरियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

‘नृत्यसमिधा’मधून गुरू प्रभा मराठे यांना मानवंदना – सविस्तर बातमी 

‘जय गजवदन’ या आदी तालातील राग।वेगवाहिनीमधील गणेश वंदनेतून गणेश स्तुती आणि कथा सादर करण्यात आली. तर राग यमनकल्याणमधील आदी तालातील रचनेने सरस्वती वंदना सादर झाली. ‘नाटेश कौतुहं’ ही राग यमनमधील शंकर वंदना सादर करत १२ ज्योतिर्लिंगाचे नृत्य वर्णन, शंकराचे वर्णन व स्तुती सादर झाली.।सुरुवातीस अनिता नेवे यांनी राग यमन कल्याणी, मिश्र चापू तालातील ‘श्री राम चंद्र कृपाळू भज मन’ या राम स्तुतीवर नृत्याविष्कार सादर केला. मर्यादा पुरुषोत्तम राम कीर्तनाच्या।सादरीकरणातील बोलके हावभाव थेट रसिकांच्या हृदयाला भिडले. नृत्य व देहबोलीद्वारे शौर्य, करुणा, प्रेम यातून श्रीरामाचे चरित्र उत्तम प्रकारे चितारले. त्यांच्या सशक्त सादरीकरणातून भक्ती, आर्तता यांची भावनिर्मिती होऊन रसिकांचेही डोळे पाणावले.

‘स्वये श्री राम प्रभू ऐकती’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राम जन्म, रामलिला, गुरुकुल, तारिका वध, सीता स्वयंवर, राम वनवास, शूर्पणखा, सीताहरण, हनुमान भेट, लंका दहन, सेतू बंधन, राम-रावण युद्ध आणि श्रीरामांचे अयोध्येत परतणे असे निवडक प्रसंग नृत्याविष्कारातून साकारण्यात आले. कर्नाटकी संगीतात रंगलेले भरतनाट्यम्‌ आणि मराठी गीतरामायण याचे सादरीकरण सुखद धक्का देणारे होते. टाळ्यांच्या कडकडाट रसिकांनी याला दाद दिली.

आनंद माडगूळकर म्हणाले, गीत रामायणात आपण अनेक वर्षे न्हाऊन निघत आहोतच परंतु गीत रामायणावर नृत्याविष्कार बघून खूप छान वाटले. नृत्याला योग्य ठरणारे प्रसंग निवडले गेले. वेगवेगळ्या प्रांतात गीत रामायणाच्या नृत्यशैलीचे सादरीकरण व्हायला हवे. नगरसेविका मुक्ता जगताप यांनी सादरीकरणाचे व आयोजकांचे कौतुक केले. मंजू पेंढारकर यांच्या माहितीपूर्ण सूत्रसंचालनाला रसिकांनी विशेष पसंती दर्शविली. मिताली वाळिंबे, मयूर भानुकुमार यांच्या सुरेल गायनावर संपूर्ण सादरीकरण झाले. त्यांना श्रीमान व्यंकटेश(पखवाज), आशिष कदम (की-बोर्ड), सुनील अवचट (बासरी), अजय चंद्रमौळी (व्हायोलिन) यांनी साथसंगत केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×