खराडातील ब्लु बेरी चौकात अपघात
marathinews24.com
पुणे – भरधाव पीएमपीएल बसचालकाने बेदरकापणे गाडी चालवून एका पादचारी जेष्ठेला चिरडल्याची घटना २९ एप्रिलला दुपारी पावणेतीनच्या सुमारास खराडातील ब्ल्यू बेरी चौकात घडली आहे. याप्रकरणी बसचालकाविरूद्ध खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानंदा मुंजाजी आरसुळ (वय ७१ रा. खराडी गावठाण) असे ठार झालेल्या जेष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मारोती आरसुळ (वय ३५) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जखमींच्या मदतीला सरसावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महानंदा आरसुळ या २९ एप्रिलला खराडातील ब्ल्यू बेरी चौकातून पायी जात होत्या. त्यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत भरधाव वेगातील पीएमपीएल बसचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे महानंदा चाकाखाली सापडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोनाली भदे तपास करीत आहेत.
बसचालकांना नियमांची अॅलर्जी
शहरातील विविध भागातून वहन करणार्या पीएमपीएल बसचालकांकडून अनेकवेळा वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बस शेजारून दुचाकी चालवावी की नाही असा प्रश्न दुचाकीस्वारांना पडत आहे. प्रामुख्याने रेसचा आवाज करीत शेजारील दुचाकीस्वाराला घाबरविणे, सिग्नल सुटल्यानंतर बेफाम बस चालविणे, मोटार चालकांना कट मारणे, इतर वाहन चालकांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. शासकीय कामाचा आधार घेउन अनेक बसचालक- वाहकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे संबंधितांविरूद्ध कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
चांदणी चौकात बसचा ब्रेक फेल, सहा वाहनांना उडविले
बसचा ब्रेक फेल होउन झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास चांदणी चौकात घडला होता. दरम्यान, यापुर्वीही बसचालकांनी बेदरकारपणे वाहने चालवून हकनाक पादचार्यांचा जीव घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बेशिस्त आणि बेदरकारपणे बस दामटणार्यांविरूद्ध पीएमपीएल प्रशासन कारवाई का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.