वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
marathinews24.com
पुणे – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामांसाठी संबंधित विभागाने ३१ मे अखेर प्रशासकीय मान्यतेकरीता प्रस्ताव सादर करावे. विभागाने नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत किमान एक नाविन्यपूर्ण उपक्रम मंजूरीकरीता सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जळगाव सुपे येथील लोकशाही दिनात २१ अर्ज प्राप्त- तहसीलदार गणेश शिंदे – सविस्तर बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामांसाठी संबंधित यंत्रणांनी ३१ मे पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन डिसेंबरअखेर कामे पूर्ण करावीत. कामाबाबत प्रशासकीय मान्यतेकरीता प्रस्ताव सादर करताना खरेदीचे प्रस्ताव वगळून सादर करावे. जिल्ह्यात विज्ञान प्रयोगशाळा (सायन्स लॅब) करण्याकरीता कार्यवाही करा. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी केंद्रांसाठी शाळेच्या परिसरात जागा उपलब्ध होण्याकरिता प्रयत्न करावे. जिल्ह्यातील कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन झाल्याची खात्री करुन घ्यावी. सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा विचारात घेवून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद यांच्या आराखड्यानुसार जलसंधारणाची कामे सुचवावी.
जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर कामाचा आढावा घेतला जाणार असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध कामे करण्याकरिता प्रयत्न करावे.
जिल्हा नियोजन समितीत मंजूर करण्यात आलेल्या कामांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने उपलब्ध करुन दिलेल्या संकेतस्थळावर भरावी. सदरचे संकेतस्थळावरील माहिती लोकप्रतिनिधीसहित सर्वसामान्य नागरिकांना भविष्यात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभाग प्रमुखाने संकेतस्थळावर अचूक माहिती भरावी. कामाच्या ठिकाणी कामाबाबत माहिती देणारे माहिती फलक लावावे,असेही जिल्हाधिकारी. डुडी म्हणाले.