प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र पोलीस दलात निवड
marathinews24.com
जुन्नर – शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या जुन्नर तालुक्यातील मु. सितेवाडी येथील रहिवासी सुवर्णा बाळु दुधवडे यांनी महाराष्ट्र पोलीस भरती २०२४-२५ मध्ये घवघवीत यश मिळवत महाराष्ट्र पोलीस दलात आपली जागा निश्चित केली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘माझी शाळा, माझा फळा’ जिवंत देखाव्यातून शाळेच्या आठवणींना उजाळा – सविस्तर लेख
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि प्रेरणेचा वारसा जपत सुवर्णा दुधवडे यांनी पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सुरक्षा बलात (MSF) आपले कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास सुरू ठेवला. नोकरीची जबाबदारी सांभाळून त्यांनी घेतलेली ही गरुडभरारी सर्वांसाठीच अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे.
सुवर्णा दुधवडे यांच्या या दैदिप्यमान यशामुळे सितेवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे ‘अभिनंदन! करत पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा देण्यात येत आहेत.





















