गुरुपौर्णिमेनिमित्त वर्षातून एकदाच ठेवले जाते तळघर खुले
marathinews24.com
पुणे – पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवार, दि. 10 जुलै रोजी सकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत खुले असणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त वर्षातून एकदाच तळघर खुले राहात असल्याने मंदिराच्या तळघरातील दलपतगिरी गोसावी यांच्या समाधीचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
वारी मार्गावर पुरविली ९ लाखांवर वारकऱ्यांना आरोग्य सेवा – सविस्तर बातमी
ऐतिहासिक, शिल्पवैभवाने नटलेले आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिव पावन असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली वेगळी असून वेरूळच्या कोरीव लेणीदृश्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. श्री त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे याची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. या मंदिरातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी 26 ऑगस्ट 1754 मध्ये या मंदिराची निर्मिती केली.
तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. दरवर्षी गुरु पौर्णिमेनिमित्त तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी खुले करण्यात येते. भाविकांनी गुरु पौर्णिमेनिमित्त मंदिराला भेट देऊन श्री त्रिशुंड गणेशाचे आणि दुर्लभ असलेल्या तळघरातील समाधीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.