सरकार तुम्हाला अडचणींतून बाहेर काढण्यासाठी सक्षम; उपमुख्यमंत्री अजित पवार
marathinews24.com
पुणे – देशात आणि राज्यात ज्या समस्या आहेत, त्या सोडवायच्या असतील तर, तुमचं-आमचं हक्काचं सरकार संबंधितअडचणींतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सक्षम आहे. मग तो शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो. बारामतीप्रमाणेच सातारा जिल्ह्यासाठी विकासाभिमुख कामं करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. मेडिकल कॉलेजच्या कामाला गती देण्याचं काम आम्ही केले. नव्या पिढीला सैनिकी शाळेत चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून त्या शाळेशी संबंधित रखडलेली कामं मार्गी लावल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
शेअर बाजारातील गुंतवणूक पडली २३ लाखांना – सविस्तर बातमी
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बु. येथे आयोजित भव्य नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी आपुलकीने केलेला सत्कार स्वीकारत सन्मानित सर्व मान्यवरांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात पवार यांनी उपस्थित नागरिकांना व शेतकरी बांधवांना संबोधित केले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना तसंच तीन, पाच व साडेसात एचपी पर्यंतच्या शेती पंपधारक शेतकऱ्यांना मोफत वीज योजनांसाठी आम्ही भरीव तरतूद केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नितीन गडकरी यांच्या सहकार्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्ग उभारण्याची काम आम्ही हाती घेतली आहेत. नवीन रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. फलटण ते बारामती मार्गाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. मेट्रोची कामं सुद्धा जलद गतीनं सुरू आहेत.
जगातली गुंतवणूक, देशातील गुंतवणूक, राज्यातली गुंतवणूक वाढावी याकरिता शक्य तिथे राज्यात विमानतळ असणं आवश्यक आहे. त्यामुळे उद्योग, रोजगार आदींशी संबंधित प्रश्न सुटण्यास मदत होईल. क्षेत्र कोणतंही असो, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असता त्यात तुम्हाला आमची गरज भासेल, तिथे आम्ही राज्य सरकार म्हणून तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या आदर्श विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालत आहे. जनकल्याणाच्या कार्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.