उद्योजक मुकेश अंबानी यांनी मांडली कल्पना
marathinews24.com
मुंबई – भारत केवळ एक देश नाही ती कथांची एक अशी समाजव्यवस्था आहे, जिथे कथात्मक मांडणी ही एक जीवनशैलीच आहे,” असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी नुकतेच जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील भाषणात केले. कथात्मक मांडणी ही भारतीय जीवनशैलीशी घट्टपणे विणलेली वीण असून, इथल्या महाकाव्यांपासून पौराणिक कथांपर्यंत, कथात्मक मांडणी हा भारताचा वारसा राहिला. आशय हा महत्वपूर्ण असून, चांगल्या कथांना कायमच बाजारपेठेत मोल मिळते. हे कालातीत तत्त्व असून, हेच जागतिक मनोरंजनाचा आधार आहे असे त्यांनी सांगितले.
अंबानी म्हणाले, भारत हा जगाच्या मनोरंजन उद्योग क्षेत्राचे मुख्य केंद्र बनणार असल्याची कल्पना उपस्थितांसमोर मांडली. आपल्या संबोधनातून त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनाची प्रेरणा देणार्या दृष्टिकोनाबाबत प्रशंसा केली तसेच वेव्हज शिखर परिषद ही याच भविष्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे गौरवोद्गारही काढले. भाषणातून अंबानी यांनी जागतिक संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात भारताचा वाढत्या प्रभावावावरही शिक्कामोर्तब केले. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ अर्थात राजकीय क्षेत्रापलीकडची सांस्कृतिक ताकद असल्याचे लोक म्हणतात, मात्र ही भारताची खरी ताकद असल्याचे आपण मानतो असे त्यांनी सांगितले.
अंबानी म्हणाले की, आकर्षक आशय मांडणी, गतिमान लोकसंख्याशास्त्र आणि तंत्रज्ञानात्मक नेतृत्व या तीन स्तंभांनी बळकट असलेल्या मनोरंजन क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी देश सज्ज आहे. भारताची डिजिटल क्रांती ही केवळ व्यापकतेची कथा नाही तर ती आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि परिवर्तनाची कहाणी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.