खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – दुचाकी लावण्याच्या वादातून वडील, मुलासह तिघांवर टोळक्याने हल्ला केल्याची घटना भवानी पेठेतील हरकानगर भागात घडली. टोळक्याने शिवीगाळ करुन त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी १२ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली.
आरिफ मैनुद्दीन शेख (वय ३८), त्यांचा मुलगा आयान, मावस भाऊ रिझवान अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फैजना शेख, फिरोज शेख, रिहान शेख, फरहान शेख, जिशान शेख, वसीम शेख, आसिफ शेख, नसीमा शेख, नफीसा शेख, शाहीन शेख, शायनाज शेख, तब्बसुम शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरिफ शेख यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिहान शेख, वसीम शेख, नसीमा शेख, तब्बसुम शेख यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि आरिफ शेख हे भवानी पेठेतील हरकानगर भागात राहायला आहेत. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास आरिफ शेख यांचा मुलगा आयान हरकानगर परिसरात दुचाकी लावत होता. त्या वेळी आरोपींनी दुचाकीला लाथ मारली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरिफ आणि त्यांचा मुलगा आयान यांनी आरोपींना जाब विचारला. तेव्हा आरोपींनी आरिफ, आयान आणि रिझवान यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. झटापटीत आरोपी फिरोज शेखने आरिफ यांचा मुलगा आयान याच्या पाठीवर चाकूने वार केले. आयान गंभीर जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत.
हाॅर्न वाजविल्याच्या वादातून टोळक्याने भाऊ-बहिणीला बेदम मारहाण
हॉर्न वाजवल्याच्या वादातून टोळक्याने बहीण भावंडाला बेदम मारहाण केल्याची घटना केल्याची भवानी पेठेतील गुरुनानकनगर परिसरात नुकतीच घडली. टोळक्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत तिघे जण जखमी झाले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. टोळक्याने केलेल्या मारहाणीत करण ललित केसवाणी (वय २८), भाऊ हर्ष आणि बहीण निकिता हे जखमी झाले आहेत. टोळक्याने करण यांचे आजोबा भारत यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. याप्रकरणी शोएब उमर सय्यद (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याच्यासह पाच ते सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात किरकोळ वादातून मारहाणीच्या घटना वाढीस लागल्या आहेत.