रस्त्याच्या कामामुळे एकाच मार्गिकेतून वाहतूक
marathinews24.com
पुणे – शहरातील मार्केट यार्डातील गंगाधाम ते शत्रूंजय मंदिर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू केले आहे. या कामामुळे गंगाधाम रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. एकाच मार्गिकेतून वाहतूक सुरु ठेवण्यात येणार असून, जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
शिरुरमध्ये मेफेड्रोन जप्त तिघे अटकेत – सविस्तर बातमी
‘शत्रूंजय मंदिर ते साळवे गार्डन (कोंढवा-अप्पर इंदिरानगर चौक) या परिसरात सिमेटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. महापालिकेकडून गंगाधाम चौकापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार केला जाणार आहे. पहिल्या टप्यात गंगाधाम चौकातून शत्रूंजय मंदिराकडे जाणारा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे या भागात एकाच मार्गिकेतून वाहतूक सुरू आहे. अरुंद रस्त्यामुळे या भागातील कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. यामार्गावर फक्त दुचाकी वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
अरुंद रस्त्यामुळे जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शत्रूंजय मंदिर, कोंढवा बुद्रुक, व्हीआयटी महाविद्यालय, खडी मशीन चौक, तसेच इस्काॅन मंदिराकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. गंगाधाम चौकातून बिबवेवाडीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लुल्लानगर, कोंढवा खुर्द, किंवा बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर या मार्गाचा वापर करावा. रस्त्यचे काम पूर्ण होईपर्यंत वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.























