खडकी, येरवडा भागातील घटना
marathinews24.com
पुणे – एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूक – वेगवेगळ्या घटनेत एक लाख रुपयांची फसवणूक केली. खडकी बाजार, तसेच येरवडा भागात या घटना घडल्या. येरवडा भागातील शास्त्रीनगर परिसरात एका बँकेच्या एटीएमधून पैसे काढणाऱ्या तरुणाकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्याच्या खात्यातून ४० हजारांची रोकड लांबविली. याबाबत एका तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खून – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण येरवड्यातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता. त्या वेळी दोन चोरटे एटीएममध्ये शिरले. तरुणाकडे मदतीचा बहाणा केले. एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी केली. त्याच्याकडील सांकेतिक शब्द आणि डेबीट कार्ड घेतले. त्यानंतर चोरट्यांनी पैसे काढण्याचा बहाणा केला. चोरट्यांनी त्यांच्याकडील डेबिट कार्ड तरुणाला दिले. एटीएममधून पैसे बाहेर न आल्याने तक्रारदार तरुण तेथून निघून गेला. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या डेबिट कार्डचा गैरवापर करुन त्याच्या खात्यातून ४० हजारांची रोकड चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक सुर्वे तपास करत आहेत.
खडकी बाजार परिसरात एटीएमधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून चोरट्यांनी ६० हजारांची रोकड लांबविल्याची घटना शुक्रवारी (११ जुलै) दुपारी घडली. याबाबत ज्येष्ठाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास खडकी बाजार परिसरातील एका बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी मदतीचा बहाणा करुन ज्येष्टाकडील डेबिट कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. चोरट्यांनी त्यांच्याकडील डेबिट कार्ड त्यांना दिले. चोरलेल्या डेबिट कार्डचा वापर करुन चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ६० हजार रुपये काढून घेतले. पोलीस उपनिरीक्षक शरद देठे तपास करत आहेत.
पानपट्टीवर झालेल्या किरकोळ वादातून तरुणाचा खून
पानटपरीवर झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली. आर्यन साळवे (वय २५, रा. सटाणा, नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धैर्यशील मोरे (वय ३०, रा. साई सिध्दी चौक) याला अटक करण्यात आली. आर्यन साळवे हा मूळचा नाशिकमधील सटाण्यातील आहे. त्याचे मामा धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहायला आहेत. पंधरा दिवसांपूर्वी तो मामाकडे राहण्यासाठी आला होता. तो एका केशकर्तनालयात काम करत होता. शुक्रवारी (११ जुलै) रात्री तो साडेदहाच्या सुमारास साई सिद्धी चौकातील पानपट्टीवर पान खाण्यासाठी गेला होता. त्या वेळी आरोपी धैर्यशील मोरे पानपट्टीवर सिगारेट ओढत होता.
धैर्यशीलने आर्यनकडे पाहिले. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादातून धैर्यशीलने कोयत्याने आर्यनवर वार केले. आर्यनने कोयत्याचा वार हातावर झेलला. त्याची बोटे तुटली. त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला. या घटनेत आर्यन गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी दिली. पोलिसांनी धैर्यशीलला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करत आहेत.