मंत्री मत्स्यव्यवसाय यांनी तत्काळ संघटना व आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन समन्वयाने धोरण तयार करावे- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
marathinews24.com
मुंबई – “ससून डॉकमधील मासेमार कामगारांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज” – विधान परिषदेच्या सभागृहात आमदार राजेश राठोड यांच्या लक्षवेधीवर कुलाबा ससून डॉक परिसरातील मासेमारी व्यवसायाशी संबंधित महिला व कामगारांच्या समस्यांवर आज चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगाने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एक महिन्याच्या आत संबंधित आमदार, मत्स्य व्यवसाय मंत्री आणि संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींना समवेत घेऊन बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.
यासंदर्भात बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “मासेमार संघटनांमधील काही गटांना जाणीवपूर्वक डावलून त्यातील महिलांना धमकावून त्रास दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे ” त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या, “मासळी सोलण्याच्या प्रक्रियेत महिलांचे हात रक्तबंबाळ होतात. हा एक गंभीर प्रश्न असून, त्यावर तांत्रिक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. महिलांना रोजगार गमावू न देता, त्यांचा त्रास कमी होईल अशा स्वरूपाचे तंत्रज्ञान वापरता येईल का, याचा विचार व्हावा.”
या चर्चेला उत्तर देताना मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, “इंडोनेशिया या देशाने मासेमारीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. त्याच धर्तीवर आम्हीही ससून डॉक येथे इंडोनेशियन तज्ज्ञांकडून सर्वेक्षण करून त्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, याचा अभ्यास सुरू केला आहे. महिलांना दिलासा देण्यासाठी योग्य उपाय निश्चितच राबवले जातील.”
लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत आ.राजेश राठोड यांचे सोबत आ.सुधाकर आडबाले ,आ.चित्रा वाघ,आ.सचिन अहिर यांनी सहभाग घेतला होता. डॉ. गोऱ्हे यांनी या संपूर्ण विषयाची गांभीर्याने दखल घेत तातडीने संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले असून, मासेमारी करणारे कामगार विशेषतः महिलांच्या समस्या आणि त्यांचा रोजगार न बुडवता तंत्रज्ञानांचा वापर हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्याचे स्पष्ट केले आहे.