महिलेसह दोघांना बेड्या, विश्रामबाग पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर दर्शन रांगेत थांबलेल्या महिला भाविकाच्या मुलीचे दागिने चोरणार्या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना ४ एप्रिलला दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. माधुरी संतोष डुकरे-घाडगे ( वय ३०, रा. यवत, दौंड) आणि काव्य तनवीर जाधव (वय २१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पुणे : नकली नखावरून मोलकरणीची चोरी आली उघडकीस – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला इंदापूर तालुक्यातील विठ्ठलवाडीत राहणारी आहे. ४ एप्रिलला दुपारी तीनच्या सुमारास तक्रारदार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर दर्शन रांगेत थांबली होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन आरोपी माधुरी आणि काव्यने तक्रारदार महिलेच्या मुलीच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चैन काढून घेत चोरी केली. याप्रकरणी महिलेला महिलेसह चोरटा दिसून आल्यामुळे तिने आरडाओरड केली. त्यानंतर भाविकांसह सुरक्षारक्षकांनी चोरट्यांना पकडून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलीस अमलदार काटे तपास करीत आहेत.
सुरक्षारक्षकांकडून हाराकिरी, हातातील मोबाइल ठरतोय घातक
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर परिसरात अनेक सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. मात्र, बहुतांश वेळा संबंधित कर्मचारी, सुरक्षारक्षक सातत्याने मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे चोरट्यांचे फावले जात असून, गावाहून आलेल्या भाविकांसह लहान मुले सोबत असलेल्या कुटूंबियाला टारगेट करून दागिने हिसकावले जातात. त्यामुळे मंदीर प्रशासनाकडून सुरक्षा रक्षकांच्या हाराकिरीबाबत खबरदारी घेणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यांच्याकडील मोबाइल अनेकवेळा ड्युटी करताना अडथळा ठरत असल्याचेही दिसून आले आहे.