नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
marathinews24.com
पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत राहण्यासाठी पोलीस दलाकडून वेळोवेळी प्राधान्य दिले जात आहे. मात्र, काही गुन्हेगारी टोळ्यांकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण करणार्या कोणत्याही टोळीला सोडणार नाही. त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार असून, आम्ही त्यांना शहर सोडण्यासाठी प्रवृत्त करू, अशी भूमिका घेतली असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.
ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारी – सविस्तर बातमी
कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीने किरकोळ वादातून तरूणावर गोळीबार करीत त्याला जखमी केले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी घायवळ टोळीविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत घायवळ टोळीविरूद्ध ५ गुन्हे दाखल केले असून, त्यांचे आर्थिंक स्त्रोत बंद करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.ज्या टोळीवर यापुर्वीचे काही गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांची कुंडली तपासली जात आहे. विशेषतः कायद्याचे उल्लंघन केल्यास कोणत्याही टोळीला सोडले जाणार नाही. त्यांच्याविरूद्ध कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रामुख्याने कोथरूडमधील गुंड घायवळ टोळी, गुंड गजा मारणे टोळीसह इतर कोणत्याही टोळीला आम्ही सोडणार नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
घायवळ टोळीला मदत करणारे रडारवर
कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीला मदत करणार्यांविरूद्ध माहिती संकलित करण्यात सुरूवात झाली आहे. पासपोर्ट काढण्यासह विविध ठिकाणी मदत करताना काहीजणांना सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्धही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तांत्रिक विश्लेषणाद्वारे कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, दहशतीच्या जोरावर जर कोणाची घायवळ टोळीने लुटमार केली असल्यास, त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. आम्ही संबंधितांना नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नागरिकांची सुरक्षितता महत्वाची असून, त्याला बाधा निर्माण करणार्या गुन्हेगारी टोळ्याविरूद्ध कारवाई केली जात आहे. प्रामुख्याने आंदेकर टोळीविरूद्ध केलेली कारवाई, कुख्यात नीलेश घायवळ टोळीविरूद्ध आतापर्यंत ५ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे कोणत्याही गुंड टोळीला सोडणार नाही. त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करून, टोळीला शहर सोडण्यास भाग पाडणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर



















