दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस सुरूच
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात पादचारी महिलेकडील दागिने हिसकावून नेण्याचे सत्र कायम असून, पोलिसांच्या बीट मार्शलसह गुन्हे शाखेच्या कामगिरीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मेफेड्रोन विक्री करणारे सराईत जेरबंद – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बालेवाडीत राहायला आहेत. बुधवारी (१६ जुलै) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास त्या बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे पेडेंट हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरघाव वेगाने पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.
आठवड्यापूर्वी बालेवाडीतील सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेकडील दागिने हिसकावून नेले होते. त्यानंतर रविवारी (१३ जुलै) ओैंध रस्ता भागात सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर एका तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली होती. गेल्या काही महिन्यांपासून पादचारी महिलांकडील दागिने, तसेच मोबाइल हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
मोटारीच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
पुणे – मोटारीच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या मोटारचालकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.
रामप्रतापसिंग महेसिंग राजावत (वय ५२, रा. भैय्यावाडी, ताडीवाला रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याबाबत बिनीत सिंग (वय ४२, रा. वडाचीवाडी, उंड्री ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिनीत सिंग हे राजावत यांचे चुलतभाऊ आहेत. सायकलस्वार राजावत हे १३ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील ग्रॅँड शेरेटन हाॅटेलसमोरुन आरटीओ चौकाकडे निघाले होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव मोटारीने सायकलस्वार राजावत यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजावत यांना ससून रूग्णालयात उपारासाठी दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
पिस्तूल बाळगणारा गुंड अटकेत- तळजाई परिसरात कारवाई
Crime News : पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने अटक केली. तळजाई वसाहत परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले.
ओंकार विजय मोकाशी (वय २९, रा. उत्तमनगर, एनडीए रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मोकाशी सराइत असून, त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत. तळजाई वसाहत परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस कर्मचारी उज्जवल मोकाशी, शंकर कुंभार गस्त घालत होते. त्या वेळी मोकाशी तळजाई वसाहतीत थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मोकाशी आणि कुंभार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, शंकर कुंभार, उज्जल मोकाशी, विजयकुमार पवार, शंकर नेवसे, ओंकार कुंभार, अमोल सरडे, साधना ताम्हाणे यांनी ही कामगिरी केली.