दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस सुरूच
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी धुडगूस घातला असून, पादचारी महिलांसह लक्ष्य करीत दागिने हिसकावून नेले जात आहेत. मागील काही दिवसांपासून दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटमारीचा हैदोस घातलेला असतानाही, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांना आरोपींच्या मुसक्या आवळण्यात अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला असून, पोलिसांच्या तपास कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
महंमदवाडीत भीषण आग, ४ जण जखमी, घरगुती साहित्याचे नुकसान – सविस्तर माहिती
बसस्थानकावर थांबलेल्या एका नवविवाहितेच्या गळ्यातील १ लाख ३९ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना १९ मे रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील विठ्ठलवाडीत घडली आहे. दिवसाढवळ्या चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्यामुळे परिसरातील महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी वाघोलीतील २० वर्षीय महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करीत आहेत.
रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २६ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसरमधील पिटर इंग्लड शोरूमसमोर घडली आहे. याप्रकरणी शेवाळेवाडीत राहणार्या ५५ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करीत आहेत.