पोलीस भरतीची तयारी करणार्या तरूण-तरूणींना धक्काबुक्की
marathinews24.com
पुणे – पोलीस भरतीची तयारी करणार्या तरूणांसह तरूणींना पैलवानांनी धक्काबुक्की करीत शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास सहकारनगरमधील तळजाई मैदानावर घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पैलवानांकडून तरूणांना मारहाण केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांकडून आता याप्रकरणी तपासाला गती देण्यात आली आहे.
बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीची तयारी करणारे १५० ते १७० तरूण-तरूणी दररोज तळजाई मैदानावर सरावासाठी जातात. मंगळवारी दि. १५ सकाळच्या सुमारास तरूण सराव करीत होते. त्यावेळी मैदानाच्या मध्यभागी चौघे पैलवान थांबले होते. त्यावेळी त्यांना भरतीची तयारी करणार्या मुलांनी बाजूला होण्यास सांगितले. मात्र, त्यांनी बाजूला न होता, मुलांनाच धक्काबुक्की करीत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी खात्यातंर्गत पीएसआय मैदानी परिक्षेचा सराव करणार्या एका पोलीस अमलदाराने मध्यस्थी करीत भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही पैलवानांनी त्यांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर साथीदारांना बोलावून घेतले.
पैलवानांच्या मदतीसाठी आलेल्या साथीदारांनीही तरूणांना बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली. त्याचवेळी मध्यस्थी करणार्या शिक्षकाच्या डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्नही केला. मात्र, काही तरूणींनी दगड हिसकावून घेत दुर्घटना टाळली. पैलवानांनी तरूणींचा विनयभंग करीत त्यांचीही छेडछाड केल्याचा आरोप भरतीचा सराव करणार्या तरूणींनी केला आहे. मागील काही दिवसांपासून संबंधित पैलवानांकडून आमचा पाठलाग केला जात आहे. त्यांच्याकडून अश्लील शिवीगाळ करीत टोमणे मारणे, मुद्दामहून मैदान परिसरात थांबल्याचाही आरोप काही तरूणींनी केला आहे. त्यामुळे आता संंबंधित पैलवांनाविरूद्ध पोलीस काय कारवाई करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
उद्या मैदानावर कसे येता तेच बघतो, पैलवानांची धमकी
भांडणानंतर पैलवानांनी तरूण-तरूणींना उद्या मैदानावर कसे येता, तेच बघतो असे म्हणत धमकी दिली आहे. त्यामुळे आम्हाला पैलवानांपासून भीती असून, सराव करण्यासाठी बाहेर पडावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला पैलवानांपासून संरक्षण मिळावे, तळजाई मैदानासह पर्वती मैदानावर वेळोवेळी काही पैलवान जाणून-बुजून मुलींचा पाठलाग करतात, त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी संबंधित मुलींनी सहकारनगर पोलिसांकडे केली आहे.