वडगाव शेरीतील घटना
marathinews24.com
पुणे – पत्नीने फसवणूक केल्याने तरुणाची आत्महत्या – पत्नीने दुसरा विवाह करुन फसवणूक केल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिडनी लाॅरेन्स दोरायराज (वय ३९, रा. शिलानंद हाऊसिंग सोसायटी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत सिडनी यांचा मोठा भाऊ स्टॅन्ली लाॅरेन्स दोरायराज (वय ४१) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वाती सिडनी दोरायराज (वय ३२), चेतन मोरे (वय ३५, रा. श्रीनिवास टेनामेंट, बडोदा, गुजरात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट मद्याची तस्करी पाच ठिकाणी छापे; ५ जण अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती आणि सिडनी यांचा २०१४ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर स्वातीचे चेतन मोरे याच्याशी प्रेमसंंबंध जुळले. कायदेशीर घटस्फोट न घेता. ती आरोपी चेतन मोरे याच्यासोबत राहू लागली. ‘दुसरा विवाह केल्यानंतर मी खूश नाही. मला तुझ्यासोबत राहायचे नाही. मी परत येणार आहे’, असे तिने पती सिडनी याला सांगितले. त्यानंतर स्वातीने तिचा दुसरा पती चेतन याच्याशी संगमनत करुन सिडनीकडून वेळोवेळी १५ लाख १८ हजार रुपये घेतले. परत नांदायला येते असे आमिष दाखविले.
त्यानंतर स्वाती नांदायला न आल्याने सिडनीने तिच्याकडे विचारणा केली. त्याने तिच्याकडे पैसे परत मागितले. तेव्हा ‘मी बलात्कार आणि छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करेल. तू आणखी पैसे पाठव’, अशी धमकी स्वातीने त्याला दिली. पत्नीचा छळ आणि तिच्या धमकीमुळे सिडनीने राहत्या घरात गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली, असे स्टॅन्ली दोरायराज यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
मद्य विक्री दुकाने फोडून रोकड चोरीचे प्रकार वाढीस
पुणे – वारजे माळवाडी भागातील एका मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील ११ हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत विशाल विलास पाटील (वय ४३, रा. रम्यनगरी, बिबवेवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी भागात तक्रारदाराचे पाटील वाईन्स हे मद्य विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी शनिवारी (१९ जुलै) मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गल्ल्यातील ११ हजारांची रोकड लांबविली. शनिवारी सकाळी मद्य विक्री दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मद्य विक्री दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस हवालदार सोनार तपास करत आहेत. गेल्या पंधरा ते वीस दिवसात कल्याणीनगर, येरवडा, कोंढवा भागातील मद्य विक्रीची दुकाने फोडून चोरट्यांनी मद्याच्या बाटल्या, तसेच रोकड लांबविल्याची घटना घडल्या. मद्य दरवाढीनंतर शहरात मद्य विक्री दुकानातील रोकड, मद्याच्या बाटल्या लांबविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.
बंगल्यातून रोकड लांबविली
सिंहगड रस्ता भागातील बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सात हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत गुलाब जयराम घाटे (रा. आनंदलक्ष्मी पार्क, नवी पेठ) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांची सासू सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात राहायला आहे. आनंदनगरमधील अपरानंद सोसायटीत त्यांचा बंगला आहे. शनिवारी मध्यरात्री चोरटे बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्यातील कपाटातून सात हजारांची रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक साळुंके तपास करत आहेत.
बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेले
बिबवेवाडी भागातील एका बंगल्यातून चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत उत्कर्ष गजानन तांबे (वय ४९, रा. अनिकेत सोसायटी, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबे यांचा बिबवेवाडीतील अनिकेत सोसायटीत बंगला आहे. रविवारी मध्यरात्री चोरटे बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत. शहरात चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील सोसायटी, बंगले, तसेच शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांच्या आवारात शिरून चंदनाची झाडे कापून नेली आहेत.






















