डायल ११२ वर चोरीची खोटी माहिती देणाऱ्याची रवानगी थेट कारागृहात
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – पोलिसांच्या टोलफ्री नंबर ‘डायल-११२या आपत्कालीन क्रमांकावर चोरी झाल्याची खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेची दिशाभूल केल्याची घटना जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुंभारवाडीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर संबंधित माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार प्रदोष गंगाधर जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नगर रस्त्यावर तरुणाला लुटणारे चोरटे अटकेत – सविस्तर बातमी
पोलीस प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी आरोपीला ९ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केवळ पोलिसांना विनाकारण कामाला लावण्यासाठी आणि त्यांना त्रास देण्यासाठी आपण हा बनाव रचल्याची कबुली आरोपीने दिल्याने खळबळ उडाली आहे. सद्यस्थितीत त्याची बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दि ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री १०:२० च्या सुमारास आरोपी प्रदोष जाधव याने डायल-११२ वर फोन करून मादळमोही येथील ‘बालाजी ट्रेडिंग कंपनी’ मध्ये सोने आणि पैशांची चोरी झाल्याची माहिती दिली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत मादळमोही पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राजभाऊ गर्जे आणि पोलीस हवालदार संजय गुजर यांनी तातडीने आरोपीला फोन करून घटनास्थळाचा पत्ता विचारला. त्यावेळी आरोपीने चोरी झाली नसल्याचे सांगत, केवळ पोलिसांना त्रास व्हावा म्हणून हा खोटी माहिती दिल्याचे मान्य केले.
पोलिसांनी घटनास्थळाची शहानिशा केली असता तिथे कोणतीही चोरी झाली नसल्याचे निष्पन्न झाले. या कृत्याबद्दल पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे . त्यावर आरोपीने पुन्हा उद्धटपणा करत पोलीस कर्मचाऱ्यांना फोन केला. ‘तुम्ही माझ्यावर गुन्हा कसा दाखल केला, तुम्ही येथे कशी नोकरी करता तेच बघतो’ अशी धमकी त्याने पोलिसांना दिली. या धमकीनंतर त्याच्यावर अतिरिक्त गुन्हा दाखल करून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. त्याला विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक यांच्यासमोर हजर केले असता, त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पोलीस निरीक्षक किशोर पवार, राजभाऊ गर्जे, विजय परजणे, संजय गुजर आणि शेखर हिंगावार यांच्या पथकाने केली आहे.
बीड जिल्हा आणि गेवराई पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, डायल-११२ हा क्रमांक तातडीच्या मदतीसाठी आहे. अशा प्रकारे खोटी माहिती दिल्यास खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे गैरवापर करणाऱ्यांवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्याचा पोलीस प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे .
























