पिस्तूल रोखून खुनाचा प्रयत्न करणारा सराइत अटकेत, अल्पवयीन ताब्यात
Marathinews24.com
पुणे -वैमनस्यातून पिस्तूल रोखून एकावर कोयत्याने वार करणाऱ्या सराइताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. सराइताबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन ताब्यात घेण्यात आले. गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात नुकतीच ही घटना घडली होती. प्रकाश उर्फ पक्या तुळशीराम पवार (वय २३, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ४ एप्रिलला गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात सायंकाळी राहुल किरण ढोले (रा. महर्षीनगर) आणि त्याचा मित्र सचिन माने यांना आरोपी प्रकाश पवार याने अडविले.
ठिकठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक – सविस्तर बातमी
माने याच्यावर देशी बनावटीचे पिस्तूल रोखून त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. पवार आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात माने जखमी झाला. पसार झालेल्या पवार याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. अप्पर इंदिरानगर परिसरात पवार येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विक्रम सावंत यांना मिळाली. सापळा लावून त्याला पकडले. पवार याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस, दुचाकी जप्त केली. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पिस्तूल कोठून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास भारमळ, सहायक फौजदार संजय भापकर, रमाकांत भालेराव, कुंदन शिंदे, दिनेश भांदुर्गे,श्रीधर पाटील, शंकर संपत्ते, सुधीर इंगळे, सागर केकाण, सतीश कुंभार, शीतल गायकवाड यांनी ही कामगिरी केली.