पोलिसांचा दुकानदारावर छापा, ४ लाखांचा माल जप्त
Marathinews24.com
पुणे – कपड्यांच्या दुकानात ‘यू.एस. पोलो अस्न.’ या प्रसिद्ध ब्रँडच्या बनावट शर्ट्सची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी छापा टाकून कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी ५१० बनावट शर्ट्स जप्त केले असून त्यांची किंमत अंदाजे ४ लाख ८ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हडपसरमधील महादेवनगर परिसरात असलेल्या कपड्यांच्या दुकानात कारवाई करण्यात आली.
नाना पेठेत सव्वा तीन लाखाचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
दुकान मालक तमस सुदाम गावडे (वय ३४) याला अटक केली आहे. त्याच्यावर कॉपीराइट कायदा १९५७ च्या कलम ६३ अंतर्गत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यू.एस.पी.ए. ग्लोबल लायसेंसिंग कंपनीत कार्यरत अधिकारी मंगेश जगनाथ देशमुख यांना बनावट शर्ट्स विक्रीबाबत माहिती मिळाली. त्यांनी स्वतः महादेवनगरमधील ‘रॉयल कलेक्शन इंटरप्रायझेस’ दुकानात जाऊन खातरजमा केली. त्यावेळी बनावट शर्ट्सची विक्री होत असल्याची खात्री झाली. त्यानुसार देशमुख यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्यावान गाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता दुकानावर छापा टाकला. त्यावेळी आरोपी तमस गावडे बनावट शर्ट्स विक्री करताना आढळून आला.
५१० शर्टस आठ पोत्यांमध्ये भरून केले सील
आरोपीने शर्टस कुठून आणले आहेत,याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित दुकानाची कागदपत्रे पोलिसांनी तपासली असता, हे दुकान त्याच्याच नावावर असल्याचे स्पष्ट झाले. दुकानातून ५१० शर्ट्स आठ पोत्यांमध्ये भरून सील केले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार योगिता टिळेकर तपास करत आहेत.