बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणात
Marathinews24.com
पुणे – मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिसर्या आरोपीला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सुरज दशरथ गोसावी उर्फ यादव (वय ३३ रा. दिपनगर, काटेवाडी ता. बारामती) असे कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी गोसावी हा फरार होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वालचंदनगर पोलिसांनी शनिवारी (दि. २६) त्याला ताब्यात घेत पुणे पोलिसांकडे वर्ग केले होते.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणाची ८ लाखांची आर्थिक फसवणूक – सविस्तर बातमी
बोपदेव घाट परिसरात ३ ऑक्टोबरला मध्यरात्री मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या तपासासाठी पोलिसांनी बोपदेव घाटाच्या परिसरातील ४५ गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराईतांची चौकशी केली होती. आरोपींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेकडून ६० पथके तैनात केली होती. त्यानंतर १० ऑक्टोबरला येवलेवाडी परिसरातून कनोजियाला अटक केली होती. चौकशीत आरोपी अख्तर शेख उत्तर प्रदेशातील प्रयागराजजवळ असलेल्या मूळगावी पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शेखला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून तिसरा आरोपी बाप्या उर्फ सोमनाथ गोसावी हा पसार झाला होता. अखेर त्याला वालचंदनगर पोलिसांनी पकडले. त्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी रात्री उशीरा त्याला पुणे पोलिसांनी पुण्यात आणले होते. रविवारी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ११२२/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७०(१) , १२६ (२), ११५ (२), ३०९( ६), ३५२, ३५१( २) ३५१ (३), शस्त्र अधिनियम कलम ४, २५ ,महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१ )१३५ मधील आरोपी बाप्या उर्फ सोमनाथ गोसावी याला न्यायालयाने ०५ दिवसांचा पोलीस ठोठावली आहे.
कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार
आरोपी कनोजिया आणि त्याचे साथीदार लूटमारीचे गुन्हे करण्यासाठी ते मध्य प्रदेशातून पुण्यात आले होते. बोपदेव घाटात गुन्हा करण्यापूर्वी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी मोबाइल बंद केले. घाटात एकेठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते लूटमार करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांनी एकातांत बसलेल्या तरुण-तरुणीला पाहिले. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्यांनी दोघांना मारहाण केली. कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी बोपदेव घाटातून उतरले. अर्धा तास ते एके ठिकाणी थांबले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून पुढे गेले.
पोलिसांचा माग चुकविण्यासाठी पायवाटेचा वापर
आरोपींनी मुख्य रस्ता टाळून पायवाटेचा वापर करीत सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात ते गेले. तेथून ते आडमार्गाने गेले. आरोपींनी त्या भागात यापूर्वी लुटमारीचे गुन्हे केल्याने त्यांना तेथील माहिती होती. सीसीटीव्ही कॅमरे कोणत्या भागात आहेत, याचीही त्यांना माहिती होती. सासवड येथील आमराई वस्ती परिसरातील पेट्रोल पंपावरील चित्रीकरणात संशयित आरोपी आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी चित्रीकरण तपासले, तेव्हा मद्य विक्री दुकानात पाचजण मद्यप्राशन करत असल्याचे दिसून आले. त्यापैकी एक जण सराइत होता. पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेतला. त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने या प्रकरणतील तीन आरोपींची माहिती दिली. तांत्रिक तपासात आरोपीचा वावर बोपदेव घाटात असल्याचे आढळून आले. तांत्रिक तपास, खबर्याची माहिती आणि रेखाचित्र तंतोतंत जुळल्याने एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.