सोहळ्यावर एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची असणार नजर
marathinews24.com
पुणे – शहरातील वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी पुणे पोलिसांकडून ८ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन सोहळ्यावर एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. प्रथेप्रमाणे विसर्जन मिरवणूक सोहळ्याचा प्रारंभ शनिवारी (६ सप्टेंबर) मंडईतील टिळक पुतळा परिसरातून होणार आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ एक तास आधी होणार आहे.
पुण्यात गणपती विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस सज्ज- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी
विसर्जन मिरवणूक सोहळ्याच्या निमित्ताने बंदोबस्ताची आखणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह विविध विसर्जन मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. मिरवणूक सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षण मनोरे प्रमुख चौकात उभे केले जाणार आहेत. गर्दीतील चोरी, छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसंचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान, राज्या राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.
प्रखरझोतांचा वापर करण्यास मनाई-सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा
विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रखऱ लेझरझोतांचा वापर करु नये, असे आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत. लेझरझोतांचा वापर करणाऱ्या मंडळांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विसर्जन मार्गावर वैद्यकीय केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. गर्दीत संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आल्यास त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात विसर्जन सोहळा पाहण्यासाठी देशभरातून भाविक येतात. विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. विसर्जन मिरवणूक शिस्तबद्धपद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त






















