३ दिवस ते ३ मिनिटे बातम्यांचा प्रवास अनुभवणारे अरुण मेहेत्रे, झी 24 तास, पुणे हा माझा अखेरचा साईनऑफ…!
Marathinews24.com
पुणे– मंडळी नमस्कार, पत्रकारिता म्हणजे नेमकं काय असते, हे जाणून घायचं असेल तर हा लेख वाचला पाहिजे. झी २४ तासचे जेष्ठ पत्रकार अरुण म्हेत्रे यांनी आपल्या पत्रकारितेला रामराम केला आहे. जवळपास २४ वर्षे त्यांनी विविध ठिकाणी जबाबदारीने वार्तांकन केले आहे. २००१ आली बुलढाणा येथून पत्रकारिता करण्यासाठी केलेली सुरवात, ३ सेकंदाच्या बातमीसाठी ३ दिवसांची मेहनत त्यांनी उत्कृष्टरित्या मांडली आहे. आताच्या जमान्यात सुपरफास्ट बातम्यांसोबत त्याची तुलना होऊ शकत नाही. आमचा राम राम घ्यावा, अशा शब्दांत अरुण म्हेत्रे यांनी हा लेख लिहला आहे.
अरुण म्हेत्रे यांच्याविषयी सहकाऱ्यांनी काढलेले उद्गार
– क्यों जा रहे हो भाई? कोई दिक्कत तो नहीं? चलिए आपने तय करही लिया है तो आगे ज्यों कुछ भी करोगे उसके लिए शुभकामनाएं
झी समूहाचे सर्वेसर्वा डॉ. सुभाष चंद्राजी
– थांब आणखी काही काळ, तुझ्यासाठी काहीतरी सोयीची पोझिशन create करतो. जायचं ठरवलं पण पुढचा म्हणजे आर्थिक स्थैर्य राहील याबद्दल नीट विचार केलायेस ना?
झी 24 तासचे संपादक आणि माझे मित्र कमलेश सुतार
– अरूण असा ब्रेक घ्यायचा असतो होय? मला तुमचा राग आलाय. मी ऐकून घेणार नाही, seperation request मागे घ्या.
झी 24 तासच्या डेस्कवरील सहकारी आणि सगळ्यांच्या मॅडम बागेश्री
– सर थांबा आणखी काही काळ, मग आपण सगळेच सोडू एकदम.
झी 24 तासचा पुण्यातील कॅमेरामन नितीन
– सर आम्ही कमलेश सरांशी बोलतो. तुमचा राजीनामा स्वीकारू नका सांगतो. तुम्ही थांबा आमच्यासोबत आणखी काही काळ.
झी 24 तासचे पुणे ब्युरोमधील सर्व सहकारी
आपने कमलेश सरसे बात भी कर ली है। वरना मैं आपको छोड़ती नहीं।
झी 24 तासच्या मुंबईतील एचआर प्रमुख श्वेता मॅडम
नमनालाच मांडलेलं हे पाल्हाळ कदाचित आत्मस्तुती वाटेल. पण माझ्यासाठी हे 22-24 वर्षे झी परिवारासोबत केलेल्या कामांचं सार्थक आहे. समाधान आहे..नमस्कार सगळ्यांना ! काहीनाही, जरा स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला वेळ द्यावा म्हणतोय…
स्वतःला आनंद मिळावा, समाधान मिळावं असं काहीतरी करावं म्हणतोय.
खरं सांगायचं तर स्वतःचा स्वार्थ साधावा म्हणतोय.
रुढार्थानं बोलायचं तर महिन्याला गलेलठ्ठ पगाराची नोकरी कायमस्वरूपी सोडतोय याचं आश्चर्य निश्चितच वाटू शकतं.
पण आता ठरलं…
कुणाविषयी तक्रार नाही, कुणाशी भांडण नाही, कुणाबद्दल राग नाही, द्वेष नाही.
कामाला सुरुवात केली तेव्हा बुलढाण्यात शूट केलेल्या बातमीची कॅसेट मुंबईत तिसऱ्या दिवशी पोहोचायची. आता 3 सेकंदात बातमी टीव्हीवर असते. तेव्हा 3 दिवस ते 3 सेकंद असा हा प्रवास आहे. पत्रकारितेचं स्वरूप आणि गती कशी बदलली त्याचा मी साक्षीदार, भागीदार आहे…
एप्रिल 2001 मध्ये त्यावेळच्या अल्फा टिव्ही मराठी पासून सुरू झालेला प्रवास झी मराठी मार्गे झी 24 तास पर्यंत पोहोचला. बुलढाण्यावरून निघालेली गाडी पिंपरी चिंचवडमार्गे पुण्यात मुक्कामी पोहोचली आणि स्थिरावली.
स्ट्रिंगर, रिपोर्टर ते ब्युरो चीफ असा हा प्रवास..24 वर्षांचा हा काळ पत्रकारिता शिकण्याचा आणि पत्रकारिता जगण्याचा होता.
त्यातून माझं आयुष्य समृद्ध होत गेलं.पद, पैसा, प्रतिष्ठा सारंकाही आपसूक लाभलं.
माझे आजवरचे सर्व सहकारी आणि माझी संस्था यांच्याप्रति मी मनापासून कृतज्ञ आहे. सहकाऱ्यांचं केवळ सहकार्यच नाही तर, भरभरून प्रेमही लाभलं.
नावांची यादी मुद्दामहून देत नाही. त्यात सगळीच आहेत.
काम करत असताना जोडली गेलेली विविध क्षेत्रातील माणसं, त्याचं काम, त्यांचं ज्ञान, त्यांचं प्रेम आणि वेळप्रसंगी संताप आणि नाराजीही होती. हे सारं माझ्यासाठी मोलाचं आहे.
मी सगळ्यांचे आभार मानतो. माझ्याकडून एखादवेळी काही चूक झाली असेल, माझ्या वागण्याने, बोलण्यानं कुणी दुखावला किंवा दुखावली असेल तर मनापासून माफी मागतो. आपण मोठ्या मनानं मला त्या दडपणातून मला मुक्त कराल याची खात्री आहे.
मी एक सामान्य माणूस आहे. हातात टीव्ही चॅनलचा माईक नसताना, माझ्या पाठीशी कुठलाच बॅनर नसतानाही तुम्ही माझी आठवण ठेवाल, माझ्यावरचं प्रेम कायम ठेवाल ही अपेक्षा.काहीसं अधूनमधून उद्भवणारं पाठीचं दुखणं आणि पायांत सायटीकाचा त्रास सोडल्यास आज 49 व्या वर्षी प्रकृती अगदी उत्तम आहे.
मुलाचं छोटं शिक्षण आणि घराचं एक मोठं कर्ज अजून बाकी आहे. पण दिवसा असो वा रात्री, झोप छान लागते.तेव्हा आज इथे थांबतोय.पत्रकारितेतला आजवरचा प्रवास म्हणजे असंख्य अनुभवांचा खजिना आहे. तो यथावकाश मांडता येईल. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शिवमुहूर्तावर राजीनामा दिला. त्यानंतरचा नोटीस पिरियड आज संपला आणि 14 एप्रिल।बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी नोकरी नावाच्या जबाबदारीतून मुक्त झालो.
पुढे अजून बरच काही शिकायचय, तेव्हा आपली मदत लागणारच आहे. भेटत राहू. टीम झी 24 तास आणि झी मीडिया समूहाला पुनश्च एकदा प्रणाम आणि मनःपूर्वक धन्यवाद.
अरुण मेहेत्रे, झी 24 तास, पुणे हा माझा अखेरचा साईनऑफ…! आणि हो, मी कुठेही असलो तरी तुम्ही पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे…
जय हिंद, जय महाराष्ट्र !
जय भीम, जय शिवराय !!