गुन्हे शाखेच्या कॉप्स 24 मध्ये होते कार्यरत, पोलीस उपायुक्त यांचा दणका
marathinews24.com
पुणे – पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या कॉप्स 24 पथकात कार्यरत असलेल्या 3 पोलीस शिपायांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. पोलीस नियंत्रण कक्षात तक्रार आल्याची बतावणी करीत त्याच्याकडून 3 हजार रुपये संबंधित पोलीस शिपायांनी घेतल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर बेशिस्तपणाचा ठपका ठेऊन निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी दिले आहेत.
पोलीस शिपाई संतोष जगु शिंदे, प्रतिक महेश त्रिंबके आणि दिनेश संतोष इंगळे (तिघेही नेमणुक, कॉप्स २४ बीट मार्शल, गुन्हे शाखा पुणे) अशी निलंबित करण्यात आलेल्या शिपायांची नावे आहेत.
पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना गंडवत होता – सविस्तर बातमी
बाणेर सी. आर. मोबाईल गाडीवर चालक संतोष शिंदे, प्रतिक त्रिंबके आणि दिनेश इंगळे यांची नेमणुक कॉप्स २४ बीट मार्शल, गुन्हे शाखेत आहे. रात्रपाळीस काम करीत असताना त्यांनी तक्रारदार प्रविण रावत (कल्याण रेसिडेन्सी, शिवालय सोसायटी पाषाण) हे सोसायटीचे चेअरमन आहेत. सोसायटीमधील पार्कीगची फ्लोअरिंग काही दिवसांपासुन खराब झाली होती, त्यामुळे त्याच्यावर स्लॅब टाकुन दुरुस्ती करण्याचे ठरविले होते. त्यानुसार रविवार दि १३ एप्रिलला सकाळच्या सुमारास काम सुरु केले जाणार होते. परंतु ठेकेदाराला कामासाठी लागणारे आरएमसी दुपारी मिळाले. त्यामुळे काम सुरु करण्यास ६ तास उशीर झाला होता. त्यावेळी रात्री बाराच्या सुमारास बाणेर सी.आर. मोबाईल तेथे गेले होते. गाडीतुन २ पोलीस अंमलदार खाली उतरले त्यांनी तक्रारदार यांना “ काम का सुरु केले आहे हे काम बंद करुन टाका, तुमच्याविरुध्द डायल ११२ वर तक्रार आहे असे सांगितले.
“तुम्ही आमच्यासोबत बालेवाडी पोलीस स्टेशनला चला” असे पोलीस संबंधिताला म्हणाले. त्या दोन्ही पोलीसांपैकी एकजणाने “ तुम्ही एक काम करा, आम्हाला थोडे पैसे द्या, तुमचे काम १५ ते २० मिनिटांत पुर्ण होईल. परत कोणाची तक्रार आली तर आम्ही अर्ध्या तासाने येतो. आम्ही परत आल्यानंतर काम संपलेले पाहीजे” असे म्हणाला. त्यावेळी तक्रारदाराने किती पैसे असे विचारले असता त्यांना ५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
तडजोडअंती ३ हजार रुपये शिपाई शिंदे, त्रिंबके व इंगळे यांनी स्वीकारले . बेजबाबदार, बेफिकीर, नैतिक अध:पतनाचे गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबई पोलीस (शिक्षा व अपिले) नियम १९५६ मधील नियम ३ (१- अ) (एक) (ब) च्या तरतुदीनुसार व पोलीस अधिनियम १९५१ मधील नियम २५ अन्वये प्राथमिक/विभागीय चौकशीच्या आधारे तिघांना शासकीय सेवेतून निलंबित ” करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिले आहेत.