पुणे अग्निशमन दलाच्या मुख्यालय मैदानावर पार पडला सोहळा
marathinews24.com
पुणे – अग्निशमन सेवा सप्ताहाचा सांगता समारोह २० एप्रिलला पुणे अग्निशमन दलाच्या मुख्यालय मैदानावर पार पडला. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट स्टिकिन् या जहाजाला आग लागून झालेल्या भीषण स्फोटात अग्निशमन व विमोचनाचे कार्य करीत असताना मुंबई अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुचनेनुसार जनतेमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रत्येक वर्षी १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो.
“संघटित व्हा, अग्नि सुरक्षित भारताला प्रज्वलित करा” हे घोषवाक्य यावर्षी जारी करण्यात आले होते. या सप्ताहाच्या सुरवातीला १४ एप्रिलला दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी एरंडवणा येथील शौर्यस्तभांस पुष्पचक्र अर्पण करीत भवानी पेठेतील मुख्यालयात ध्वजवंदन केले. “टोपी उतार” करीत कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यादरम्यान शहर परिसरात शाळा, महाविद्यालये, शासकीय संस्था, रहिवाशी व व्यापारिक इमारती, मॉल, मेट्रोस्थानके अशा विविध ठिकाणी आग व आपत्कालिन परिस्थितीत कशाप्रकारे कार्य करावे यासंदर्भात व्याख्याने व प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. दरम्यान, वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी तसेच ड्युटीवर नसताना कर्तव्य बजावणारे आणि एखाद्या वर्दिवर जीवाची बाजी लावून आग विझवताना जखमी झालेल्या अशा जवानांचा मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सन्मान केला. सांगता समारोहवेळी मुख्यालयाच्या मैदानावर जवानांनी सुरेख असे संचलन करीत आगीविषयक प्रात्यक्षिक सादर केली. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांचे कुटूंबीय व नागरिक उपस्थित होते.
पुणे महानगरपालिका कै.मधुकर सखाराम बिडकर ब्लड सेंटर या अंतर्गत रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य अग्निशमन अधिकारी समवेत जवानांनी रक्तदानात सहभाग घेतला. अग्निशमन अधिकारी पंकज जगताप यांनी सुञसंचालन केले. पुणे शहर पोलिस विभागाचे बँड पथकाचे सहकार्य लाभले.