भोर तालुक्यातील वरवे खुर्द गावातील राजगड वाॅटर पार्क रिसोर्टमध्ये घडली घटना
marathinews24.com
पुणे – झिपलायनिंग साहसी क्रीडा प्रकार करताना ३० फूट उंचीवरुन कोसळून संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भोर तालुक्यातील वरवे खुर्द गावातील राजगड वाॅटर पार्क रिसोर्टमध्ये शुक्रवारी घडली. दरम्यान, सुरक्षाविषयक उपाययोजना न करता दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी राजगड वाॅटर पार्कच्या मालकासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन – सविस्तर बातमी
तरल अरुण आटपाळकर (वय २८, रा. सेलिसिया पार्क, नऱ्हे-धायरी रस्ता, झिल महाविद्यालय चौक) असे मृत्युमुखी पडलेल्या संगणक अभियंता तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी राजगड वाॅटर पार्कच्या मालकांसह व्यवस्थापक अनिल जाधव, दिलीप गोसावी, कर्मचारी विशाल कुमार, श्रीरमे कुमार, स्वप्नील दिवळे यांच्यासह ७ जणंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर श्रीपती आटपाळकर (वय ५०) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरल आटपाळकर ही एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत अभियंता होती. तरल आणि कुटुंबीय शुक्रवारी (१८ मे) भोर तालुक्यातील वरवे खुर्द गावातील राजगड वाॅटर पार्कमध्ये गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरल ‘झिपलायनिंग’ हा साहसी क्रीडाप्रकार करत होती. ३० फूट उंचीवर असलेल्या सांगड्यावरील (स्ट्रक्चर) योग्यरित्या लावण्यात आला नव्हता. तरल स्टूलवर उभी राहिली. त्यावेळी स्टूल हलल्याने तरल ३० फूट उंचीवरुन कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
पुरेशी सुरक्षाविषयक काळजी न घेता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी राजगड वाॅटर पार्कच्या मालकांसह सातजणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरलच्य काकांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे, अशी माहिती राजगड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड यांनी दिली. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेस नेहमीच प्राधान्य देण्यात आले – राजगड वाॅटरपार्क प्रशासनची माहिती
१५ वर्षांपासून वाॅटर पार्क सुरू आहे. २०१८ मध्ये वाॅटर पार्कमध्ये साहसी क्रीडा प्रकार सुरू करण्यात आले. पर्यटकांच्या सुरक्षेस नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. वाॅटर पार्कमध्ये गर्दी वाढल्यास सुरक्षेच्या कारणास्तव क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना प्रवेश देण्यात येत नाही, असे राजगड वाॅटर पार्कच्या व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे.